मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांची महापौरपदी, तर संजय घाडी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी रितू तावडे यांच्या निवडीचे स्वागत केले. “रितू तावडे यांच्याकडे एक अत्यंत अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून पाहिले जाते. मुंबईतील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच आक्रमक आणि ठाम भूमिका घेतली आहे,” अशा शब्दांत फडणवीसांनी त्यांचे कौतुक केले. महायुती सरकारने मुंबईच्या विकासासाठी जो कार्यक्रम हाती घेतला आहे, तो महापालिकेच्या माध्यमातून तावडे अतिशय सक्षमपणे पुढे नेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन राज्याचे नेते अजित पवार यांच्या मृत्यूबाबत गंभीर शंका उपस्थित केली होती. अजित पवारांचा मृत्यू हा केवळ अपघात नसून त्यामागे घातपाताची शक्यता असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, “रोहित पवार यांची ती पत्रकार परिषद मी पाहिलेली नाही. मात्र, अजितदादांच्या अपघाताबाबत कोणाच्याही मनात काही शंका असतील, तर त्याचे निरसन होणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू आहे. डीजी सेफ्टी, सीआयडी आणि डीजीसीए यांसारख्या यंत्रणांमार्फत तपास सुरू असून, तपासासाठी महत्त्वाचा असलेला ‘ब्लॅक बॉक्स’ देखील सापडला आहे.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “या दुर्दैवी अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मी स्वतःच केंद्र सरकारला सर्वप्रथम पत्र लिहिले होते. त्यावर त्वरित कार्यवाही करत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी समिती स्थापन केली आहे. जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यावर तर्क-वितर्क लढवणे योग्य नाही, कारण यामुळे लोकांच्या मनात नाहक संभ्रम निर्माण होतो. आपल्या देशातील तपास यंत्रणा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असून, त्यांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास दाखवू नये.” शंका उपस्थित करणे चुकीचे नाही, परंतु अजितदादांच्या दुर्दैवी निधनाचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) आहे. फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com









