अकोला : कामकाजात ९९ टक्के परिपूर्णता असली तरी उर्वरित प्रलंबित एक टक्का कामांबाबत जाब विचारून तो ऐरणीवर आणला जाईल, अशी इशारा वजा तंबी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी जिल्हा परिषदेतील विविध विभागाच्या विभागप्रमुख, अधिकार्यांच्या आढावा बैठकीत दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यावेळी त्यांनी प्रामुख्याने नरेगा, स्वच्छता अभियान, घरकुल व १५ व्या वित्त आयोगातील योजनांवर भर दिला.
नवनियुक्त विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेतील कामकाजाचा आढावा घेतला. तब्बल अडीच तास चाललेल्या या आढावा बैठकीत यावेळी त्यांनी सर्व विभागांच्या समन्वयातून योजना मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच यापूर्वीच्या कामकाजापेक्षा येथून पुढे राबविण्यात येणार्या योजना, कामकाज विचारात घेतले जाईल. त्यादिशेने पावले उचलून तळागाळातील घटकांपर्यंत योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, योजना रखडता कामा नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, पंचायतच्या विस्तार अधिकार्यांसह अन्य स्तरावरील विस्तार अधिकार्यांनी आपल्या दौरे व टूूर डायरी ठेवावी. सोमवार व शुक्रवार वगळता फिल्ड व्हिजीट द्यावी. तसेच ग्रामसेवकांनीदेखील टूर डायरी ठेवून नेमून दिलेल्या दिवसी ग्रामपंचायतमध्ये दिवसभर हजर राहणे बंधनकारक राहील. ग्राम रोजगार सेवकांनीदेखील गावांतील कामे योग्यरीतीने करावीत, अशा स्पष्ट सूचना श्वेता सिंघल यांनी दिल्या. ग्रामसेवकाला आपल्या गावात कोणत्या योजना सुरु आहेत. त्यातील लाभार्थ्यांबाबत इत्थंभूत अर्थात खर्चासह डाटा आपल्या डायरीत नोंद असला पाहिजे.
पंचायतस्तरावर ग्रामसेवक व ग्राम रोजगारसेवक यांची दर १५ दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला जावा. तर, १५ व्या वित्त आयोगाच्या कामांचा सरपंच व सचिव यांना बैठकीला बोलावून आढावा घ्यावा आदी सूचना श्वेता सिंघल यांनी यावेळी केल्याचे सूत्रांनी सांगितले. ई-ऑफिस कार्यप्रणालीबाबत माहिती घेतल्यानंतर ही प्रणाली अधिक सुटसुटीत कशी करता येईल, याबाबत मते जाणून घेतली.
’ब’ दर्जाच्या प्रस्तावाबाबतचा विषयही यावेळी घेण्यात आला. पं.स. तेल्हारा व पातूरच्या प्रशासकीय इमारत तसेच नमो ग्रामपंचायत भवनाबाबत सकारात्मक चर्चाही केली. तर, प्रत्येक अधिकार्यांनी एक पसंतीचे गाव निवडून सर्व विभागाच्या समन्वयातून गाव योजना मार्गी लावाव्यात.
तीन विभाग अजेंड्यावर
या आढावा बैठकीपूर्वी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत शिक्षण, बांधकाम व महिला बालकल्याण विभागांतर्गत योजना अजेंड्यावर आणल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीडीओशिप इज द टफेस्ट जॉब
गटविकास अधिकारी (बीडीओ) इज द टफेस्ट जॉब असून, त्यांना दिवसभर स्वाक्षर्या कराव्या लागतात. त्यामुळे ही पदे अतिमहत्त्वाची ठरतात, असे श्वेता सिंघल यांनी यावेळी स्पष्ट केले. तर पूर्ण होऊ शकणारी कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले. पुढील आढावा बैठकीत विभागांसह पंचायतनिहाय प्रत्येक विभागप्रमुखांच्या कामांचा आढावा घेतला जाईल, असेही बैठकीला अवगत केले.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com