अमरावती : तुला मारतो, मीही फाशी घेतो, असे म्हणत एका ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तिने आरडाओरड केल्याने तिचा जीव वाचला. भातकुली तालुक्यातील एका गावात २३ मार्च रोजी रात्री १.३० च्या सुमारास ती घटना घडली. या प्रकरणी खोलापूर पोलिसांनी पीडित ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून २५ मार्च रोजी दुपारी आरोपी दीपक केवदे (वय ४०, रा. अमरावती) विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी व फिर्यादी परस्परांचे ओळखीचे आहेत. आरोपीने तिला बाहेर भेटायला बोलावले होते. मात्र, ती त्याला भेटण्यास गेली नाही. त्यामुळे आरोपीने २३ मार्च रोजी तिचे खेडेगाव गाठले. तथा त्याने तिच्याशी हुज्जत घातली. एक मर्डर केला तर किती सजा होईल, अशी वल्गना करत त्याने तिला मारण्याची धमकी दिली. तुझा खून करतो, मी सुध्दा फाशी घेतो, असे बरळत त्याने पीडित महिलेच्या गळ्यात चहाट (दोर) टाकला. तथा – गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





