दामदुप्पट आकारणीने शेतकऱ्यांचे शोषण; ‘एआर’द्वारा कारवाई का नाही?
अमरावती : जिल्ह्यातील बहुतेक परवानाधारक सावकारांद्वारा अवैध सावकारी होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना व्याज आकारणीचा वार्षिक ९ टक्के दर ठाऊकच नाही. त्यामुळे अनेक सावकारांद्वारा महिन्याचे ३ टक्के म्हणजेच वार्षिक ३६ टक्के व्याज आकारणी होत आहे. अशा परिस्थितीत एकाही सावकाराकडे व्याज आकारणीचा सूचना फलक लावला नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक शोषण होत असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात परवानाधारक ६६७ आहेत. यापैकी ९९ टक्के सावकारांकडे शेतकरी व नागरिकांना कर्ज वितरण व व्याजाची आकार, या साठीचे फलक लावण्यात आलेले नाही. याबाबत सावकारी अधिनियम, शासनाचे राजपत्र व प्रधान सचिव (सहकार) यांच्या अध्यक्षतेखाली १६ मे रोजीच्या बैठकीनुसार प्रत्येक परवानाधारक सावकाराने माहितीचा फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील सावकारांनी मात्र शासन निर्देशाला हरताळ फासला आहे. राज्यात अवैध सावकारीबाबत सर्वाधिक कारवाया अमरावती जिल्ह्यात झालेल्या आहेत. यामध्ये परवानाधारक सावकारदेखील अवैध सावकारी करीत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
अमरावती, अचलपूर तालुक्यात सर्वाधिक जिल्ह्यात ६६७ परवानाधारक सावकार आहेत. यामध्ये सर्वाधिक २४९ सावकार एकट्या अमरावती तालुक्यात तर १५३ अचलपूर तालुक्यात आहेत. भातकुली ९, अंजनगाव २४, धामणगाव २३, वरुड ४४, धारणी २१, नांदगाव १४, चांदूर रेल्वे ११, चांदूरबाजार ४३, तिवसा १९ व दर्यापूर तालुक्यात १४ सावकार आहेत. पेसा कायद्याने चिखलदरा तालुक्यात सावकारी परवाना नाही.
सूचना फलकात हा मजकूर अनिवार्य सहकार विभागाच्या माहितीनुसार प्रत्येक परवानाधारकाने माहितीचा सूचना फलक लावणे अनिवार्य आहे. यामध्ये सावकाराचे नाव, फर्मचे नाव, परवाना क्रमांक, वैधता दिनांक, परवाना कार्यक्षेत्र, सावकारी व्यवसायाचे ठिकाण, कर्जाचा प्रकार शेतकऱ्यांकरिता तारण कर्ज ९ टक्के प्रतिवर्ष, विनातारण कर्ज १२ टक्के प्रतिवर्ष, शेतकरी व्यतिरिक्त इतर व्यक्तींना तारण कर्ज १५ टक्के प्रतिवर्ष व विनातारण कर्ज १८ टक्के प्रतिवर्ष, ही माहिती सूचना फलकावर अनिवार्य आहे.
सर्व ‘एआर’ यांना २० मे रोजी पत्र देऊन परवानाधारक सावकारांनी सूचना फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत पुन्हा पाहणी करून कारवाई करू.
शंकर कुंभार,जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)
या सर्व सावकारांच्या दप्तराची तपासणी करण्यात सहायक निबंधक कार्यालयाद्वारा दिरंगाई किंबहुना बेपवाई होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





