छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही केवळ महाराष्ट्रासाठीच नाहीतर जगभरातील शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. या 12 किल्ल्यांपैकी 11 किल्ले महाराष्ट्रातील असून, जिंजी किल्ला हा तामिळनाडूमध्ये आहे. युनेस्कोच्या या घोषणेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला. तसंच, राज्य सरकारचे कानदेखील टोचले आहेत. राज यांनी आपल्या पोस्टमधून या किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचा सल्लादेखील दिला आहे.
‘किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अतिरिक्त निधी द्या’ : राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘आता युनेस्कोनं या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे, त्यामुळे त्यांचं योग्यरित्या जतन आणि संवर्धन केलं जाईल, कारण एखाद्या वास्तूला जागतिक वारसा असा दर्जा मिळाल्यानंतर कठोर नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.’ तसंच, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्त या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा,” असं आवाहनही राज यांनी राज्य सरकारला केलं आहे.
राज यांनी टोचले राज्य सरकारचे कान : राज यांनी आपल्या पोस्टमध्ये राज्य सरकारचे कानदेखील टोचले आहेत. “युनेस्कोनं जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येणार नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं. सरकारनं फक्त आनंद साजरा करू नये, तर एका मोठ्या जबाबदारीचं भानदेखील बाळगावं”. सोबतच, गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तत्काळ पाडून टाका. त्यात जात – धर्म पहाण्याची गरज नाही, असा सल्लाही मनसे अध्यक्षांनी दिला. यावेळी राज यांनी ओमानच्या ‘अरेबियन ऑरिक्स अभयारण्य’ आणि जर्मनीच्या ‘ड्रेस्डेन व्हॅली’ कडून हा दर्जा काढून घेण्यात आल्याचं उदाहरण देखील दिलं आहे.
‘या’ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश : युनेस्कोनं जाहीर केलेल्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या 11 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचाही या यादीत समावेश आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





