आयआयएम कोलकातामधील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली होती, असे पीडितेनं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी मेडिकल कॉलेज, त्यानंतर लॉ कॉलेज आता आयआयएम कोलकातामध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयआयएमच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे. या घटनेनंतर विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं आहे.
दक्षिण कोलकातामधील लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाची देशभरात चर्चा झाली. हे प्रकरण थंड होईपर्यंत दुसरी घटना समोर आली आहे. आयआयएम कोलकातामध्ये मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या आयआयएमच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. त्या विद्यार्थ्यानं कोल्ड्रिंकमध्ये मादक पदार्थ मिसळून मुलीला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
- कोलकातामधील पोलीस अधिकारी रूपेश कुमार म्हणाले, “आम्ही घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून कॉलेज कॅम्पसमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.”
समुपदेशनाच्या नावाखाली कॉलेजमध्ये बोलाविलं- पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार करणारी मुलगी ही आयआयएमची विद्यार्थिनी नाही. आरोपी विद्यार्थी आणि मुलगी दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दोघांचे सोशल मीडियावर संभाषण झाले होते. शुक्रवारी विद्यार्थ्यानं समुपदेशन सत्राच्या नावाखाली मुलीला आयआयएममध्ये बोलावल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुलीच्या जबाबानुसार, विद्यार्थ्यानं आवश्यक कागदपत्रे घेण्याच्या बहाण्यानं तिला समुपदेशन स्थळा बोलाविलं होतं. मात्र, तिला मुलांच्या वसतिगृहातील खोलीत नेले. मुलांच्या वसतिगृहात नेत असताना तिला ‘व्हिजिटर बुक’वर सही करू दिली नाही. आरोपी विद्यार्थ्यानं मुलीला पिझ्झा आणि कोल्ड्रिंक खायला दिल्याचंही तपासात उघड झालं आहे. मुलीनं पिझ्झा खाल्ल्यानंतर बेशुद्धावस्थेत आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. मुलीनं विरोध केल्यानंतर आरोपी विद्यार्थ्यानं तिला मारहाणही केली.
सुरुवातीला आरोपीला ताब्यात, नंतर अटक-पीडितेन पोलिसांना असेही सांगितले, “ती कशीबशी मुलांच्या वसतिगृहातून सुटका करून घेत पळाली. थेट हरिदेवपूर पोलीस स्टेशन गाठत बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली. तिला देण्यात आलेल्या कोल्ड्रिंकमध्ये मादक पदार्थ होते,” असा पीडितेनं दावा केला. मुलीनं तक्रार दिल्यानंतर हरिदेवपूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं तपास सुरुवात केली. तक्रार मिळाल्यानंतर त्याच रात्री पोलीस अधिकारी वसतिगृहात पोहोचले. पोलिसांनी दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन नंतर अटक केली.
- बंगळुरूचा आहे आरोपी- पोलिस सूत्राच्या माहितीनुसार आरोपी विद्यार्थी बंगळुरूमधील आहे. त्याने २०२३ मध्ये कॅट परीक्षेद्वारे व्यवस्थापन अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. आरोपी हा जून २०२४ पासून आयआयएम कोलकातामध्ये शिकत आहे.
आयआयएममधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह- आयआयएम कोलकाताचा कॅम्पस बराच मोठा असल्यानं सुरक्षा रक्षक नेहमीच तैनात असतात. तरीही, बलात्काराची घटना कशी घडली? याबाबत पोलीस तपास करत आहेत. तसेच कॉलेजची विद्यार्थिनी नसतानाही मुलगी मुलांच्या वसतिगृहात कशी पोहोचली? याचादेखील पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी शुक्रवारी रात्री सुरक्षा रक्षक आणि काही कॉलेजच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तसेच मुलांचे वसतिगृह आणि कॉलेज कॅम्पसचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे.
लॉ कॉलेजमध्येदेखील झाला होता बलात्कार- उल्लेखनीय बाब म्हणजे २५ जून रोजी दक्षिण कोलकात्याच्या कसबा भागात असलेल्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कॉलेजमध्ये तीन जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॉलेजचा तात्पुरता कर्मचारी मनोजित मिश्रासह दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





