नागपूर महामार्ग रोखला : दुतर्फा वाहनांची रांग, महिला शेतकऱ्यांची उपस्थिती
अमरावती : शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांचा ७/१२ कौरा करण्याच्या मुख्य मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या मालिकेत नांदगाव पेठ टोलनाक्यावर प्रहार संघटनेचे शहरप्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात चक्का जाम करण्यात आला. दुपारी १२ नंतर झालेल्या या आंदोलनामुळे नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. टोलनाक्याच्या दुतर्फा महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. टोलनाक्यापुढील महामार्गावर झालेल्या या आंदोलनात महिला शेतकऱ्यांची उपस्थिती दखलनीय होती. ‘७/१२ कोरा, कोरा, कोरा’ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी रेटण्यासाठी केलेली फलकबाजीही लक्षणीय ठरली. आंदोलकांनी सरकारविरोधी निदर्शनेदेखील केली. विशेष म्हणजे, प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ रमीचा प्रतीकात्मक डावही खेळला. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे व मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुमारे दोन तास हे चक्का जाम आंदोलन झाले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





