गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना, गावी कोकणात जायचं कसं, असा यक्ष प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे.
मुंबई : गणेशोत्सव हा कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठंही असलेला चाकरमानी गणेश चतुर्थीला गावी कोकणात जाणारच! विशेषतः मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गानं गणेशभक्त गावी जात असतात. पण, यंदा त्यांच्या मार्गात विघ्नांची मालिका उभी राहिली आहे. रेल्वेचं आरक्षण अवघ्या काही सेकंदांमध्ये फुल्ल झालं. त्यामुळं बस किंवा खासगी वाहनानं जायचं म्हटलं तर रस्त्यांवर जीवघेणे खड्डे… हवाई प्रवासाचा तर विचारच सोडा! मोठा गाजावाजा करीत सुरू झालेली मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) विमानसेवा गेल्या 9 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळं गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना, गावी कोकणात जायचं कसं, असा यक्ष प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे.
मुंबई ते गोवा असा उलटा विमान प्रवास : मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या 13 वर्षांत पूर्ण न झाल्यामुळं चाकरमानी अलिकडे रस्त्यांपेक्षा रेल्वेला अधिक पसंती दर्शवतात. मात्र, मागच्या काही वर्षांत गणेश चतुर्थीचं आरक्षण अवघ्या काही सेकंदांमध्ये फुल्ल होत असल्यानं अधिकांश प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागते. अशावेळी महामार्गाची अवस्था, प्रवासाचा वेळ आणि खर्च यांचा अंदाज बांधून चाकरमानी विमान वाहतुकीचाही विचार करू लागले होते. चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई-सिंधुदुर्ग (चिपी) विमानसेवेमुळं त्यांना आधार मिळत होता. मात्र, मागील 9 महिन्यांपासून हा पर्यायही बंद झाला आहे. गणेशोत्सवापूर्वी ही हवाईसेवा सुरू होण्याची शक्यता धुसर असल्यानं, अनेकांनी मुंबई ते गोवा असा उलटा विमान प्रवास करून सिंधुदुर्गला पोहोचण्याचा पर्याय चाचपडून पाहिला. मात्र, विमान कंपन्यांनी संधीचा फायदा घेत, या मार्गावरील तिकिटांचे दर तिपटीहून अधिक वाढवले आहेत.
चिपी विमानतळावरील सेवा का बंद पडली? : “विमान कंपनी ‘अलायन्स एअर’ ही मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) सेवा देत होती. ही सेवा तीन वर्षांच्या करार पद्धतीनं सुरू करण्यात आली होती. कराराची मुदत 26 ऑक्टोबर 2024 रोजी संपुष्टात आली. त्या पाठोपाठ ‘फ्लाय 91’ या विमान कंपनीच्या हैदराबाद आणि बंगळुरू सेवाही बंद झाली. अलीकडेच सुरू झालेली पुणे ते चिपी विमानसेवा देखील वारंवार खंडित होत असते. बऱ्याचदा पुण्याहून येणारी विमानं थेट गोव्यातील मोपा विमानतळावर डायव्हर्ट केली जात असल्यानं असल्यानं प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे,” अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी दिली.
नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांची घेतली भेट : याविषयी बोलताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, “मी काल नवी दिल्लीत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेऊन मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई ही महत्त्वपूर्ण विमान सेवा तातडीनं सुरु करण्याची मागणी केली. या चर्चेदरम्यान मंत्री नायडू यांनी, ही सेवा तत्काळ पूर्ववत करू असं आश्वासन दिलं. सिंधुदुर्गच्या विकासासाठी, पर्यटन वाढीसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही सेवा पुन्हा सुरु झाल्यामुळं प्रवासाचा वेळ वाचेल. आर्थिक व्यवहार वाढतील आणि कोकणातील पर्यटनाला नवीन उंची मिळेल,” अशी प्रतिक्रिया नाराणय राणे यांनी दिली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






