मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वात आगामी महापलिका निवडणुकीपूर्वीच बदलाचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी यासंदर्भात ईटीव्ही भारतला माहिती दिली.
मुंबई – मुंबई काँग्रेसबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. देश पातळीवर आणि महाराष्ट्रात काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्ष सावरण्याचा प्रयत्न करत असताना मुंबई काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सध्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड आहेत. पण वर्षा गायकवाड या पक्षासाठी वेळ देऊ शकत नाहीत. कार्यकर्त्यांना कोणताही कार्यक्रम देत नाहीत. त्यामुळं मुंबई काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळं मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे.
मुंबई काँग्रेसमध्ये बदल होणार? – सध्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. सतत वर्षा गायकवाड यांच्याकडून पक्षातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नेत्यांनी हायकंमाडकडे केली आहे. दरम्यान, मंगळवारी प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वर्षा गायकवाड या पक्षासाठी वेळ देऊ शकत नाहीत. तसंच आगामी पालिका निवडणुका असताना मुंबईत कुठलाही कार्यक्रम घेतला जात नाही. असा नाराजीचा सूर नेत्यांनी आळवला आहे. हे सर्व ऐकूण घेतल्यानंतर आगामी काळात मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याचं सूतोवाच काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी बैठकीत केलं असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यांना वेळ का देता येत नसावा? – दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता असून, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये बदल होण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. मुंबई काँग्रेसमध्ये अनेक नेते, कार्यकर्ते नाराज आहेत. कारण त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही. पालिका निवडणुका तोंडावर असताना मुंबई काँग्रेसकडून काही हालचाली होत नाहीत. जी मुंबई काँग्रेसची अनेक वर्षापासून परंपरा होती, ती म्हणजे गुढीपाडवा सण साजरा केला जायचा. 1 मे महाराष्ट्र दिन साजरा केला जायचा, मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ते यावर्षी केलं नाही. त्यामुळं पक्षात त्यांच्यावर नेते, कार्यकर्ते नाराज आहेत. अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेसला सोडून गेलेत, अनेकजण जाताहेत. कदाचित त्या लोकसभेच्या खासदार असल्यामुळं त्यांना येथे मुंबईत वेळ देता येत नसावा, पण मुंबई काँग्रेसमध्ये त्यांच्यावर नेते नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया मुंबईतील काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी “z24news”शी बोलताना दिली आहे.
स्पर्धेत कोणाची नावे? – एकीकडे मनपा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये अध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आमदार भाई जगताप देखील कामांमध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. जर मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलला तर त्या ठिकाणी कोणाची वर्णी लागू शकते. किंवा अध्यक्षपदाच्या शर्यतीतील अनेक नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप, काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा अशा नेत्यांची नावं मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. पण मुंबई काँग्रेससाठी नवीन अध्यक्ष कोण मिळणार, हे येणाऱ्या काळातच कळेल.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





