मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला गतिमान करणारे आणि पायाभूत सुविधांचा कायापालट करणारे प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे नेण्यास प्राधान्य दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई : “2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘मुंबई इन 59 मिनिट्स’ असा नारा देण्यात आला होता. येत्या काही वर्षांत ही घोषणा प्रत्यक्षात उतरलेली दिसेल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिली. तसंच मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला गतिमान करणारे आणि पायाभूत सुविधांचा कायापालट करणारे प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे नेण्यास प्राधान्य दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुढील वर्षी 60-70 किमी मेट्रो लाईन सुरू होईल : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या पाच महत्त्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “एमएमआरडीएला दरवर्षी 50 किमी मेट्रो लाईन सुरू करण्याचं लक्ष्य दिलं आहे. यंदाचं लक्ष्य पूर्ण झालं असून, पुढील वर्षी 60-70 किमी मेट्रो लाईन सुरू होईल. याशिवाय, लोकल रेल्वेचे डबे मेट्रोप्रमाणं सुसज्ज करण्याची योजना असून, तिकिटांचे दर न वाढवता या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील”, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री लवकरच घोषणा करतील, असं त्यांनी सांगितलं.
उद्यापासून कोस्टल रोड 24 तास खुला राहणार : याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या वापराबाबत महत्त्वाची घोषणा केली. “उद्यापासून मुंबईचा कोस्टल रोड 24 तास खुला राहणार आहे. यापूर्वी रात्री हा रस्ता बंद ठेवला जायचा. या रस्त्यावर अतिजलद वेगाने वाहन चालवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. मी वाहनचालकांना आवाहन करतो की, असे प्रकार तात्काळ थांबवावेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सर्व हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. नियम मोडणाऱ्यांना नोटीस बजावून पोलीस त्यांच्या घरी पोहोचतील,” असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
वर्ष-दीड वर्षात मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार :
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून हाती घेतलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अभियांत्रिकी आविष्कार संबोधले. “आतापर्यंत असे प्रकल्प केवळ प्रगत देशांमध्येच हाती घेतले जायचे. मात्र, एमएमआरडीएच्या माध्यमातून आपण मुंबईत असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारत आहोत,” असं त्यांनी सांगितलं.
- याचबरोबर, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबईतील 60 टक्के वाहतूक होते, याकडं लक्ष वेधताना त्यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतल्याचं नमूद केलं. “येत्या दीड वर्षात हे प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल,” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
- “मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. त्यामुळं मुंबईच्या पायाभूत सुविधा थांबवल्या, तर आपणच मागे राहू. आधीच या कामांना उशीर झाला होता. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीनं आघाडी घेतलीय, ती महत्त्वपूर्ण आहे. मी ग्वाही देतो, की मुंबईची गती थांबू देणार नाही,” असं त्यांनी नमूद केलं.
मुंबईकरांना ‘लास्ट माईल कनेक्टीव्हिटी’ देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “देशातील पहिली मेट्रो प्रशिक्षण संस्था आपण मुंबईत उभारली आहे. मेट्रोचे जाळे विस्तारल्यानंतर ‘लास्ट माईल कनेक्टीव्हिटी’ मुंबईकरांना मिळणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुविधा दर्जेदार असतील, तर खासगी वाहनांचा वापर कमी होतो, हा जागतिक अनुभव आहे. तशा सुविधा आपण निर्माण करीत आहोत,” असं त्यांनी सांगितलं. यापूर्वी अनेक प्रकल्पांना स्थगिती मिळाली होती, याकडं लक्ष वेधताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, “आमचे सरकार स्थगितीचं नाही, तर प्रगतिशील आहे. जनहिताच्या कोणत्याही प्रकल्पांना स्थगिती मिळणार नाही.” प्रत्येकाचा वेळ मौल्यवान असल्याचं सांगताना शिंदे यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. “नुसता पैसा खर्च करून प्रकल्प पूर्ण होत नाहीत, तर त्यासाठी जीव ओतावा लागतो,” असा टोला त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
मुंबईसाठी आजचा दिवस महत्त्वाचा :
- उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “मुंबईसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण, बीडीडीवासीयांना हक्काचं घर मिळाल्यानंतर आता पाच मोठ्या पायाभूत प्रकल्पांचं लोकार्पण होत आहे. यासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मुंबई ही देशाच्या विकासाचं जेट इंजिन आहे. त्यामुळं या शहराच्या गतीवर देशाचा विकास अवलंबून आहे. महायुती सरकार मुंबईला अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे, ” असं अजित पवार यांनी सांगितलं.
- याचबरोबर, मागील काळातील काही स्कायवॉकच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त करताना पवार म्हणाले, “काही स्कायवॉक इतके निकृष्ट होते की त्यावरून चालावेसेही वाटत नव्हतं. त्यामुळं ते पाडावे लागले. पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांनी दर्जेदार प्रकल्प उभारावेत. बारामतीत जागतिक दर्जाच्या सुविधा उभारल्या आहेत, त्या पाहा. बीडीडी प्रकल्पातील इमारती आणि जिओ वर्ल्ड सेंटरसारखी बांधकामे दर्जेदार असतात, तर आपण का मागे राहावे?”, असा सवाल देखील अजित पवार यांनी केला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





