दिवाळी सण जवळ आला की बाजारपेठा रंगीबेरंगी आकाश कंदीलांनी उजळतात. पिंपरी चिंचवड शहरात या आकाश कंदीलांच्या निर्मितीमागे आहे महिलांच्या आत्मनिर्भरतेची आणि आर्थिक नियोजनाची प्रेरणादायी कथा.
पिंपरी चिंचवड : स्थानिक महिलांनी एकत्र येत आकाश कंदील बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रंगीबेरंगी कागद, आकर्षक डिझाईन्स आणि नवकल्पना यांचा सुंदर संगम त्यांच्या हातातून साकारतोय. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथील भरारी महिला संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमास सुरवात केली आहे.
संस्थापिका अशा इंगळे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितलं की, गेल्या 14 वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे नवे उपक्रम राबवत असतो. महिलांच्या हातून घडलेल्या वेगवेगळ्या हस्तकलांच्या वस्तू बनवण्यापासून ते बाजारात नेऊन विकण्यापर्यंतची कामं अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. गेल्यावर्षीपासून आम्ही या हस्तकलांपैकी दिवाळी आकाश कंदील बनवण्याचे आयोजन केले होते. अगदी वीस रुपयांपासून ते दहा हजार रुपयापर्यंतचे आकाशकंदी बनवण्यात यशस्वी झालो आहोत. जवळजवळ 60 ते 70 डिझाईन असलेले आकाश कंदील यंदाच्या वर्षी बनवण्यात आले आहेत. हे आकाश कंदील होलसेल पद्धतीने बाजारात विकले जातात.
आशा इंगळे यांनी पुढे सांगितलं, “आम्ही सगळ्या महिलांनी मिळून आकाशकंदील बनवायचं ठरवलं. यातून मिळालेलं उत्पन्न आम्ही सणानंतरच्या खर्चासाठी आणि बचतीसाठी वापरणार आहोत.” या आकाश कंदील बनवण्याच्या मागे समाजातील प्रत्येक घटकातील महिलांचा समावेश असून काही दिव्यांग महिलांचा देखील समावेश आहे. महिलांनी केवळ हस्तकला दाखवली नाही, तर आर्थिक स्वावलंबनाचा मार्गही आखला आहे. त्यांनी विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचं नियोजन आधीच ठरवलं आहे. काही हिस्सा बचत खात्यात, काही नवीन व्यवसाय कल्पनांसाठी, आणि काही घरगुती गरजांसाठी वापरला जातो. दिवाळीच्या या प्रकाशात महिलांच्या हातांनी तयार झालेले आकाश कंदील फक्त घरं नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांनाही उजळवतात. आत्मनिर्भरतेचा आणि सर्जनशीलतेचा हा संगम प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतोय.
या आकाश कंदील बनवण्याची सुरुवात ही काहीतरी वेगळी असावी त्यासाठी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून सर्वप्रथम पाच कंदील बनवण्यात आले. त्यानंतर त्या कंदीलची डिझाईन मार्केटमध्ये नव्याने आल्यानं मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स यायला लागल्या. त्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी जास्त महिलांचा समावेश या कामात होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे महिला बचत गटाच्या अनेक महिलांचा समावेश करून आज संपूर्ण महाराष्ट्रभर आकाश कंदील पोहचवण्याचं काम या महिला करत आहेत. हे कंदील बनवताना कोणत्याही प्लास्टिक किंवा पर्यावरणास घातक असणाऱ्या वस्तू यांचा वापर केला जात नाही. नैसर्गिकरित्या असणाऱ्या बांबूच्या काड्या ते लाकडी चटई पासून हे कंदील तयार केले जातात. या आकाश कंदीलांपैकी आकाराने छोटे असणारे आकाश कंदील मटेरियल घेऊन महिलांना घरबसल्या बनवता येतात. परंतु मोठ मोठे असणारे आकाश कंदील हे संस्थेच्या ऑफिस कार्यालयामध्येच येऊन बनवले जातात. सद्यस्थितीत आता 25 ते 26 महिलांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला आकाश कंदील अत्यंत अल्प दरात तयार करून पुरवले आहेत. त्यातून 70 ते 75 आकाश कंदील डिझाईन तयार झाल्या आहेत. सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश या कामात आहे. परंतु स्थानिक पाठबळ म्हणून प्रशासन तसंच महानगरपालिका यांची कधीच मदत मिळाली नाही. येथे प्रत्येक महिला स्वावलंबी असून शून्यातून आपले विश्व निर्माण करत आहेत. इथून पुढे हे आकाश कंदील आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत, पुढील काळात नक्कीच परदेशात आकाश कंदील आम्ही पोहोचवू हा आत्मविश्वास आहे असं प्रतिपादन भरारी महिला फाउंडेशन संस्थापिका आशा इंगळे यांनी केलं आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





