शिंदेंवर काही बोलू नये, ते आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्यावर टीका केल्यास शिवसैनिक खपवून घेणार नाही, त्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येईल, असंही मंत्री सामंत म्हणाले.
मुंबई – भाजपा आमदार आणि मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघांमध्ये विस्तवही जात नाही. ठाणे आणि नवी मुंबईत युती झाली किंवा नाही झाली तरी भाजपाचाच महापौर असेल, असं म्हणत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली होती. याला शिवसेनेकडूनही जशाच तसं उत्तर देण्यात आलंय. यानंतर आता उदय सामंत यांनीही गणेश नाईकांना प्रत्युत्तर दिलंय. गणेश नाईक म्हणजे भाजपा नाहीत, ते सीनिअर लीडर आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेंवर काही बोलू नये, ते आमचे मुख्य नेते आहेत, त्यांच्यावर टीका केल्यास कोणताही शिवसैनिक खपवून घेणार नाही, त्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येईल, असंही मंत्री उदय सामंत म्हणाले.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही : एकीकडे महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीपूर्वी ज्या योजनांची घोषणा केली होती, त्या योजना सरकारला गुंडाळाव्या लागताहेत, तीर्थक्षेत्र योजना बंद करण्यात आलेली आहे. यानंतर शिवभोजन थाळी योजना देखील निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय. आता लाडक्या बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातून निधी वळता करण्यात आला आहे. त्यामुळं लाडकी बहीण योजना बंद होणार का? यावर बोलताना सामंत म्हणाले की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, असं मी ठामपणे सांगतो, असं सामंत म्हणाले.
महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल : आमच्यात सर्व काही आलबेल आहे. सर्व ठिकाणी रायगड, सातारा या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अपेक्षित असंच होईल आणि मी पुन्हा एकदा सांगतो, एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, असा आम्हाला विश्वास आहे. तसेच प्रत्येक पक्षाला वाटतं की, अनेक ठिकाणी आपला उमेदवार असावा, प्रत्येक पक्षवाढीसाठी काम करतो, त्यात काही वावगं नाही, पण जेव्हा उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ येते, तेव्हा शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस एकत्र निर्णय घेतात आणि संबंधित उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगतात, त्यामुळं आमच्यात उमेदवारीवरून कोणताही वाद नाही, असंही उदय सामंत म्हणाले.
कर्नाटक सरकार देशप्रेमी नाही : दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी यावी, अशी मागणी कर्नाटक सरकारने केली आहे, असा प्रश्न उदय सामंत यांना विचारला असता ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्तीने प्रेरित झालेली संघटना आहे. कर्नाटक सरकारला देशाबद्दल काहीही पडलेले नाही. कर्नाटक सरकार देशप्रेमी नाही. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करतात, त्या काँग्रेस सरकारला देशाविषयी प्रेम नाही. म्हणून कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर बंदीची मागणी केली असावी, असंही मंत्री उदय सामंत म्हणाले. दुसरीकडे महायुतीत कुठेही पालकमंत्रिपदावरून वाद नाहीये, जरी कोणत्या जिल्ह्यात पालकमंत्री नसला तरी तिथला विकास थांबला नाही, असं सामंत म्हणाले.
तर ते नक्की राज ठाकरे विचारतील : आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळं शिवसेना (ठाकरे) आणि मनसेची युती होणार असल्याचं बोललं जातंय. राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीत येण्याबाबत संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे. यावर बोलताना सामंत म्हणाले की, राज ठाकरे हे महाविकास आघाडीत जाणार की नाही हे माहीत नाही, मात्र जर ते मविआत जाणार असतील तर ते काँग्रेस वारंवार सावरकरांचा अपमान करतंय, कर्नाटकमधील मराठी लोकांवर अन्याय होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्नाटकमध्ये पुतळा हटवला जातोय, याबाबत नक्कीच काँग्रेस पक्षाची नक्की भूमिका काय आहे? हे विचारतील, असंही उदय सामंत म्हणाले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





