दसरा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
कोल्हापूर : देशातील प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि लेह-लडाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात सोमवारी (13 ऑक्टोबर) कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भाजपा आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवत दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला. यावेळी, “जोपर्यंत सोनम वांगचुक यांची जेलमधून मुक्तता होत नाही, तोपर्यंत कोल्हापुरातून सुरू झालेलं, हे आंदोलन देशभर सुरूच राहील, ” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
अटकेच्या निषेधार्थ मोर्चा : लेह-लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, भारतीय राज्यघटनेतील सहावे परिशिष्ट लागू व्हावं, या मागणीसाठी आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या (रासुका) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या निषेधार्थ देशभर पडसाद उमटले आहेत. कोल्हापुरातही इंडिया आघाडीच्या वतीनं सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी इंडिया आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. यावेळी सभेला संबोधित करताना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजय देवणे यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. “न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करण्यात येत आहे. यामुळं देश हुकूमशाहीकडे चालला आहे,” असं विजय देवणे यांनी सांगितलं. तर “सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरातून सुरू झालेली चळवळ देशभर पोहोचेल,” असा विश्वास कॉम्रेड उदय नारकर यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन : दरम्यान, सोनम वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत झालेल्या संविधान विरोधी आणि अन्यायकारक अटकेसंदर्भात तात्काळ न्यायपूर्ण कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचं निवेदन इंडिया आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेली अटक तात्काळ रद्द करून त्यांना मुक्त करावं, या प्रकरणाची स्वतंत्र न्यायिक चौकशी करावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या निषेध मोर्चात विजय देवणे, सचिन चव्हाण, आर. के. पोवार भाई बाबुराव कदम, रघुनाथ कांबळे, अतुल दिघे, संदीप देसाई शिवाजीराव परुळेकर, डी.जी. भास्कर यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





