
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
तेजांकुर बहुउद्देशीय संस्था, परतवाडा यांच्या विद्यमाने व जेसीआय (JCI) अंजनगाव सुर्जी यांच्या सहकार्याने “ज्योतीबांची सावली, सावित्री माऊली” या समाजप्रबोधनपर नाटकाचा ४९ वा प्रभावी नाट्यप्रयोग १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता ठाकरे सभागृह, सुर्जी येथे आयोजित करण्यात आला. या नाट्यप्रयोगास शहरातील नागरिक, महिला, शिक्षक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नाट्यप्रयोगाचे उद्घाटन उद्योजक व माजी नगराध्यक्ष देविदास नेमाडे यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विलास कविटकर, डॉ. श्रीकृष्ण गोरडे, डॉ. मोहन काळे, सतिश लोणकर, गणेश पिंगे, प्रकाश चांडक व सतिश हंतोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून नाट्यप्रयोगाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल जुनघरे, पंकज वर्हेकर तसेच जावरकर मॅडम यांचा जेसीआयतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित या नाटकात समाजातील अंधश्रद्धा, विषमता आणि महिलांच्या शिक्षणासाठी फुले दाम्पत्यांनी केलेले कार्य प्रभावीपणे सादर करण्यात आले. महात्मा फुले यांच्या भूमिकेत जयकुमार चर्जन, तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत सौ. अपुर्वाताई सोनार यांनी भावपूर्ण अभिनय साकारला. संवाद, सादरीकरण आणि पार्श्वसंगीतामुळे नाटक प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे ठरले.
नाट्यप्रयोगाचे आयोजन व संयोजन जेसीआय अध्यक्ष अमोल रसे, सचिव वासुदेव काळे, प्रकाश चांडक, जयेश ढोकणे, अमोल वर्हेकर, विशाल भेलांडे, चंदु गुलवाडे, श्रीकृष्ण गोरडे, प्रविण बेलसरे, नांदूरकर आणि निलेश हाडोळे यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाचे संचालन विशाल भेलांडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वासुदेवराव काळे सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी समाजात परिवर्तन घडविण्याच्या या नाट्यप्रयोगाचे कौतुक करत, अशा प्रबोधनपर उपक्रमांचे सातत्य राखावे असे प्रतिपादन केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






