सरन्यायाधीशांच्या न्यायालयात हजर करण्याची वृद्धाला धमकी; डिजिटल अरेस्टच्या भीतीनं 72 लाखांचा चुना, आयुष्यभराची कमाई गेली

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट प्रकरणात दोन ज्येष्ठ नागरिकांची 72 लाख आणि 6 कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपास सुरू केलाय.

 

नाशिक : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपयाला तर दुसऱ्या घटनेत तब्बल 6 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे भारताचे, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयात हजर करण्याची धमकी देत फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरटीजीएसद्वारे लंपास केले पैसे : नाशिक शहरातील गंगापूर रोड भागात राहणारे 74 वर्ष वृद्ध व्यक्तीला 26 ऑगस्ट 2025 रोजी एक व्हिडिओ कॉल आला. या कॉलद्वारे त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. तसंच तुमच्या नावावर मुंबईत क्रेडिट कार्ड काढलं आहे, असं सांगितलं. या क्रेडिट कार्डद्वारे बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार झाले असून मनी लाँडरिंगमध्ये तुमचा सहभाग असल्याचं सांगत त्यांना भीती दाखवली. तसंच तुम्हाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या न्यायालयात ऑनलाईन हजर करण्यात आलंय, असा बनाव करत त्या वृद्धाला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 72 लाख रुपये आरटीजीएसद्वारे भरायला भाग पाडलं.

 

72 लाखांचा दंड भरावा लागेल : “फिर्यादी वृद्धाला बनावट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यापुढं हजर केल्याचा बनाव व्हिडिओ कॉलवर रचला. बनावट सरन्यायाधीशांनी संवाद साधत 72 लाखांचा दंड तत्काळ आरटीजीएसद्वारे भरा अन्यथा सीबीआयचे पथक तुम्हाला ताब्यात घेईल. तुमच्या घराच्या परिसरात सीबीआयचं पथक आलं आहे, असं सांगत त्यांच्यावर दबाव टाकला. यानंतर 72 लाख रूपये आरटीजीएसद्वारे भरायला भाग पाडलं. बँक कर्मचाऱ्यांनी वृद्धांना एवढे पैसे कोणाला पाठवत आहात? अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी माझ्या भावाला वैद्यकीय उपचारासाठी पैसे लागतात, असं सांगत पैसे ट्रान्स्फर केले,” अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पिसे यांनी दिली.

  • वृद्ध आणि त्यांची पत्नी दोघेच एकमेकांना आधार देत जीवन जगत आहेत. त्यांच्या पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्यानं दोन-अडीच वर्षांपासून त्या झोपून आहेत. त्यामुळं त्यांना 24 तास ऑक्सिजन आणि इतर औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थयिक झालाय.

दुसऱ्या वृद्धाला 6 कोटी 25 लाखांचा गंडा : नाशिक शहरातील उच्चशिक्षित वृद्ध व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी तुमच्या मोबाईलमधून अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेत असं सांगितलं. त्यामुळं तुम्हाला डिजिटल अरेस्ट केली असून दोन महिने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क ठेऊन न्यायालयात हजर केल्याचा बनाव केला. यातून त्यांनी 6 कोटी 25 लाख रुपयांचा गंडा घातला. याबाबत नाशिक सायबर पोलीस तपास करत आहेत.

उच्चशिक्षित लोक पडतात बळी : सायबर गुन्ह्याचे बळी उच्चशिक्षित, सुशिक्षित लोक ठरत आहेत. यामध्ये इंजिनियर, सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक, डॉक्टर आणि अशा पेशातील सुशिक्षित लोक जाळ्यात अडकल्याचं आतापर्यंत दाखल विविध गुन्ह्यांमधून समोर आलंय. त्यामुळं सोशल मीडिया हाताळताना अनावश्यक एप्लीकेशन डाउनलोड करणं टाळलेलं बरं, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!