वायभारच्या नावावर व्यापाऱ्यांकडून लूट, बाजार समिती प्रशासनाची चुप्पी
राजुरा बाजार : संत्र्याचा आंबिया बहाराचे सौदे मध्यात आले असून फळाची तोड व्हायची असताना सौदा करतेवेळी व्यापारी शेतकऱ्याकडून दहा ते वीस टक्क्यापर्यंत सूट घेऊन मोफत माल नेतात. दहा क्विंटल संत्र्यावर वायभारच्या नावावर एक क्विंटल संत्री चक्क मोफत नेण्याचा प्रघात पूर्वापार आहे. याबाबत तक्रार कुठे करायची, हेच शेतकऱ्यांना कळेनासे झाले आहे.
वरूडस मोर्शीची संत्री जगभर प्रसिद्ध आहेत व देशभरातून मागणी आहे. वरूड तालुक्यात २२००० हेक्टरवर संत्रा लागवड आहे. संत्री बागेत फळास फळधारणेपासून ते परिपक्व होईपर्यंत ११ महिने असतात. शेतकरी तळहातावरील फोडाप्रमाणे जपत विविध कीटकनाशके, बुरशीनाशके, कृषी निविष्ठा यांची भर घालतो. त्यात अतिवृष्टी, गारपीट, अनैसर्गिक फळगळ आली, की शेतकरी गारद होतो. संत्रा हंगाम मध्यात असूनही अजूनपर्यंत पाहिजे तेवढी दरवाढ झाली नाही. सध्या २८०००ते ३५००० रुपये प्रतिटन भाव आहे. संत्रा व्यापारी थेट बागेत येऊन शेतकऱ्यांशी सौदा करतात. अलिखित करारानुसार दहा टनावर तोटी वायभार, कोळशीच्या नावावर एक टन वजनात काट करून चक्क मोफत संत्री शेतकऱ्यांकडून नेतात. याकडे कुणी लक्षही द्यायला तयार नसून संत्रा उत्पादक शेतकरी या रिवाजाने सैरभैर झाले आहेत.
सौद्यात वजनापेक्षा जास्त माल शेतकऱ्यांना सौद्यात वजनापेक्षा जास्त माल द्यावा लागतो. याबद्दल नाराजी असली तरी तक्रार नेमकी कुणाकडे करावी, हेच माहिती नाही. दुसरीकडे वायभाराचा व्यवहार गैरकायदेशीर व बाजार समितीच्या मान्यतेविना बिनभोबाट चालतो. शेतकऱ्याकडून दहा टक्के मोफत (काट) घेतल्यानंतरही लहान आकाराची फळे बाहेर काढून फेकली जातात. यातही शेतकरी नागवल्या जातो. दहा टक्के माल मोफत दिल्यावर वजनाची कपात करून शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते.
शेतकऱ्यांची बाजार समितीच्या मूकसंमतीने व्यापारी लूट करीत आहेत. प्रतिटनाला एक क्विंटल सूट घेऊनही लहान आकाराची फळे शेतकऱ्यांना बांधावर फेकावी लागते. शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो.
राजाभाऊ गुडधे,संत्रा उत्पादक शेतकरी, अमडापूर
घालावा पायबंद काही शेतकरी बाजार समितीच्या आवारात संत्री विक्रीस नेतात. तेथेही व्यापारी दहा ते पंधरा टक्यांपर्यंत शेतकऱ्यांकडून मोफत फळे घेतात. या व्यवहारावर पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





