– सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगरसेविका सौ. पल्लवी प्रफुल्ल गवई या आपली दावेदारी सादर करण्याची तयारी करत असून, त्यांच्या नावाची चर्चा शहरात जोमाने सुरू आहे. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, कार्यतत्परता आणि स्वच्छ प्रतिमा या गुणांमुळे त्या या स्पर्धेत एक प्रभावी आणि विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत.
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी २०१६ मध्ये पल्लवी गवई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होत नगरपरिषदेत प्रवेश केला. भाजपच्या बहुमताच्या काळात त्यांच्याकडे शिक्षण समिती सभापतीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या पदावर कार्य करताना त्यांनी शहरातील सर्व शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून ५० पानी सविस्तर अहवाल तयार केला आणि तो जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला. या अहवालाच्या आधारे नगरपरिषद शाळांच्या विकासासाठी ठोस पावले उचलली गेली.
✦ कार्यकाळातील उल्लेखनीय उपक्रम :
२०१७–१८ पासून सर्व नगरपरिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू केले.
शिक्षकांच्या सहकार्याने शाळांचे डिजिटायझेशन केले.
विद्यार्थ्यांसाठी फर्निचर व बैठक सुविधा उपलब्ध केल्या.
जुन्या शाळांची इमारत दुरुस्ती व नुतनीकरण पूर्ण केले.
उत्कृष्ट शिक्षक आणि उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार योजना सुरू केली.
नगरसेविका म्हणून प्रभाग क्र. ३ मध्ये त्यांनी तब्बल १० कोटी रुपयांहून अधिक विकास lकामे केली आहेत. मातंगपुरा भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, नवीन सार्वजनिक शौचालये, रस्ते व नाल्यांचे खोलीकरण, तसेच सौंदर्यीकरण या अनेक कामांची नोंद त्यांच्या कार्यात आहे.
“ माझा सभागृहातील मागील अनुभवाचा पुरेपूर वापर करून शहरातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण देणे हेच माझे ध्येय आहे. तळागाळातील असल्याने लोकांच्या समस्यांची मला जाणीव आहे , आणि त्यावर उपाय करणे ही माझी जबाबदारी आहे,” असे सौ. पल्लाविताई गवई म्हणाल्या.
शिक्षण, अनुभव, जनसंपर्क आणि स्वच्छ प्रतिमा या चारही बळावर पल्लवी गवई या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत एक सक्षम, तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून पुढे येत असल्याचे शहरातील राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






