सुरक्षित दिवाळीसाठी दर्यापूर पोलिसांचा सज्ज बंदोबस्त — ठाणेदार सुनील वानखडे यांचे नागरिकांना आवाहन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षेच्या दृष्टीने दर्यापूर पोलिसांनी कंबर कसली आहे. नागरिकांनी सण साजरा करताना विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले आहे. सणाच्या काळात चोरी, हातचलाखी, तसेच वाहतूक कोंडीसारखे प्रकार टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ठाणेदार वानखडे यांनी सांगितले की, “दिवाळीचा सण आनंदाचा आहे, पण सावधानता आणि सजगता तेवढीच महत्त्वाची आहे.” नागरिकांनी घरातील सुरक्षा मजबूत ठेवावी, फटाके सुरक्षितपणे हाताळावेत, तसेच गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, असे त्यांनी नमूद केले.

आकाशकंदील किंवा ड्रोन उडविताना निष्काळजीपणामुळे अपघात होऊ शकतात, म्हणून त्यावेळी विशेष काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना त्यांनी दिली.

ठाणेदार वानखडे पुढे म्हणाले की, “बाहेरगावी जाताना आपल्या घराची जबाबदारी विश्वासू शेजाऱ्यांना सांगावी आणि पोलिस ठाण्यालाही याची माहिती द्यावी, जेणेकरून चोरीसारखे प्रकार रोखता येतील.”

याशिवाय मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोकड यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. “दिवाळीचा सण आनंदात आणि सुरक्षिततेने साजरा व्हावा, यासाठी प्रत्येक नागरिकाने पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,” असे आवाहन ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013507
error: Content is protected !!