धामणगाव तालुक्यातील सहा जणांनाच २८ वर्षांमध्ये नोकरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

धामणगाव रेल्वे : एकीकडे निम्म वर्धा प्रकल्पाच्या पाण्याने जमीन सिंचनाखाली येऊन अनेकांना फायदा झाला. प्रगतीचे द्वार खुले झाले. दुसरीकडे या प्रकल्पात शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन मिळाले होते. तथापि, शासनाने उपाययोजना केलेल्या नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अनुत्तरितच आहे. २८ वर्षामध्ये आतापर्यंत केवळ सहा मुले नोकरीवर लागली आहेत.

प्रकल्पामध्ये धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचपूर, बऱ्हाणपूर, तुळजापूर, शिदोडी, वरूड बगाजी, येरली तसेच वर्धा जिल्ह्यांतील २९ गावे संपूर्णपणे व त्या गावातील १६ हजार ५६६ व्यक्ती प्रभावित झाल्या. प्रकल्पग्रस्तांनी अत्यल्प दरात त्यांची शेती व पिढ्यानपिढ्यांचे राहते घर, वाडे शासनाला दिले. तथापि, गत २८ वर्षात ३ प्रकल्पग्रस्त फक्त ९८ हजार १०० प्रमाणपत्रधारकांपैकी बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या आहेत. यात धामणगाव तालुक्यातील केवळ सहा लोकांना नोकरी मिळाली आहे.

आम्हाला हवाय न्याय!

काही विभाग प्रकल्पग्रस्तांचे असणारे पाच टक्के आरक्षण व वयोमर्यादा शिथिलतेनुसार जागासुद्धा काढत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने प्रकल्पग्रस्त युवकांनी न्यायाची अपेक्षा केली आहे.

द्यावी लागते परीक्षा

अनेक विभागांमध्ये नोकरीकरिता जाहिरात निघाल्यानंतर संबंधित प्रकल्पग्रस्तांना अर्ज करावे लागतात. कोट्यानुसार ती परीक्षा पास करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित अर्जदार हा पात्र असल्यास त्या अर्जदाराला प्रकल्पग्रस्तांच्या ठरलेल्या कोट्यानुसार नोकरी मिळते.

आ. प्रताप अडसड यांचा पाठपुरावा

जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना नोकरी मिळावी, यासाठी त्यांनी मागील तीन वर्षांमध्ये सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. आतापर्यंत किती पाल्यांना नोकरी दिली आणि किती प्रतीक्षेत आहे, याविषयी त्यांनी माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात मांडली. ज्या विभागाने आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना न्याय दिला नाही, त्याविषयी त्वरित चौकशी करावी, असेही राज्य शासनाला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना नोकरी देण्यासंदर्भात प्रशासन वेळकाढू धोरण स्वीकारत होते. नागरी सुविधांसंदर्भातही वर्धा येथील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत होते. आ. प्रताप अडसड यांच्या पाठपुराव्यामुळे आता प्रशासनाला जाग आली आहे.

रामदास निस्ताने, प्रकल्पग्रस्त तथा माजी सभापती, जिल्हा परिषद

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013506
error: Content is protected !!