नाशिक सिंहस्थ कुंभमेळा : ठेकेंदारांनी चांगल्या दर्जाची कामं करावीत, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या सूचना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नाशिक शहराचा दौरा करत अधिकाऱ्यांकडून रस्ते बांधकाम कामाचा आढावा घेतला.

 

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नाशिक शहराचा दौरा करत अधिकाऱ्यांकडून रस्ते बांधकाम कामाचा आढावा घेतला. यावेळी एका बांधकाम कॉन्ट्रॅक्टरनं थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना क्लब टेंडर न करता स्थानिकांना कामं द्यावी, अशी मागणी केली. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी “काम कोणत्याही ठेकेदारानं करावीत, परंतु काम चांगल्या दर्जाची करावीत,” असं सांगितलं.

प्रस्तावित कामांवर भर द्यावा : “नाशिक -त्र्यंबकेश्वर इथं होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा देशपातळीवरील महत्वाचं पर्व आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील भाविक येत असतात. प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची महती अधोरेखित होण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रस्तावित काम दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होतील यावर भर द्यावा,” असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना : “सिंहस्थ कुंभमेळादृष्टीनं कामे दर्जात्मक होण्यासाठी त्र्ययस्थ पक्षाकडून कामांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणानंही त्यांच्या स्तरावर या कामांची त्र्ययस्थ पक्षाकडून तपासणी केल्यास निश्चितच कामं गुणवत्तापूर्वक होतील. एचएएलकडून सिंहस्थ कुंभमेळ्यात बाहेरुन येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीनं ओझर विमानतळ इथल्या टर्मिनलचं अतिरिक्त बांधकाम मुदतीत पूर्ण करावं. टर्मिनलचे बांधकाम करताना प्रवासी संख्या, त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, प्रतिक्षागृह, सौंदर्यीकरण याचा प्रामुख्यानं समावेश असावा. त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथासाठी प्रस्तावित कामांना मंजुरी घेवून ते तातडीनं सुरू करावं. येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षा घेता गर्दीमुळं व पावसाळी दमट हवेमुळं श्वसनाचा त्रास होवू नये, यासाठी हवा खेळती राहील यादृष्टीनं वायूवीजन रचना करा,” अशा सूचना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

2,770 कोटींचे रस्ते होणार : “सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पहिल्या टप्प्यातील 2,200 कोटींच्या कामांना निधीची तरतुद झाली असून यात प्रामुख्यानं शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची कामं 18 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचं नियोजन करावं. दुसऱ्या टप्प्यात सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून 570 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन यांच्याकडून आलेल्या सूचनेंनुसार रस्त्यांची कामं होणार आहेत. शहरातील द्वारका सर्कल इथं होणारी वाहतुकीची कोंडीच्या दृष्टीनं सबवेचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यामातून होणार आहे,” असं मंत्री भोसले यांनी सांगितलं.

विश्रामगृहांची दुरुस्ती करावी : “रस्त्यांची कामं करताना आवश्यक भूसंपादन विहित पद्धतीनं करण्यात यावं. कुंभमेळात येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी अत्याधुनिक सेवा-सुविधा असेलेले पद्धतीचं नवीन शासकीय विश्रामगृहांचं काम संस्था निश्चित करुन सुरू करण्यात यावं, यासह जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असेलेली विश्रामगृहांची आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी निवास व्यवस्थेसह टॉयलेटच्या संकल्पनेवर पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृहे साकारण्याचं काम करण्याचं प्रस्तावित आहे,” असं मंत्री भोसले यांनी सांगितलं.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!