मुलांना ओलीस ठेवल्यामुळे पोलिसांनी रोहित आर्य याचा एन्काऊंटर केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी ओलीस असलेल्या आजी आणि नातीनं थरारक अनुभव कथन केला.
मुंबई : गुरुवारी मुंबईतील पवई इथं महावीर क्लासिक इमारतीत 17 शाळकरी मुलांना रोहित आर्य यानं ओलीस ठेवलं होतं. मुलांची सुटका करताना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्या या माथेफिरूचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. आरोपी रोहित आर्य हा मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी त्याच्यावर गोळी झाडली, असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्परता दाखवत खिडकीतून घुसत मुलांची सुखरुप सुटका केली. मात्र या प्रकरणानंतर काँग्रेसनं याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडं घटना नेमकी कशी घडली, याबाबत ओलिसांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.
ओलिसांनी सांगितला थरारक अनुभव : “माझ्या नातीची शूटींग होती, म्हणून दररोज इथं यायची. 26 ऑक्टोबरपासून मी तिला इथं घेऊन येत होते. यानंतर आम्हाला पहिल्या मजल्यावर बसवलं होतं. थोड्या वेळानं दंगा झाला म्हणून आम्हाला शंका आली. मुलांना कोंडून ठेवलंय हे कळल्यावर सगळेच घाबरले आणि रडायला लागले,” असा थरारक अनुभव शूटींगसाठी आपल्या नातीला घेऊन गेलेल्या आजीनं सांगितला आहे. तर “तळ मजल्यावर स्टोडीओमध्ये मोठमोठ्यानं आवाज येत होता. आम्हांला वाटलं की शूटींग सुरू असेल म्हणून दरवाजा बंद केला असावा. पण खालून रडण्याचा आवाज आल्यानंतर माझ्या आजीला कळलं की, काहीतरी झालं आहे. मग माझ्या आजीनं माझ्या आईला कॉल केला. नंतर पोलीस आले,” असा अनुभव शूटींगसाठी गेलेल्या एका मुलीनं सांगितला आहे.
घटनेला सरकार जबाबदार आहे, काँग्रेसची टीका : दुसरीकडं “रोहित आर्यनं केलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. मुलांना ओलीस ठेवलं याला राज्य सरकार जबाबदार आहे, सरकारनं त्याचं म्हणणं काय आहे, ऐकलं पाहिजे होतं. त्यामुळं या घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली आहे. तर “रोहित आर्य कोण आहे? ऑडिशनसाठी ज्याच्याकडं आपण पाठवतोय, ती व्यक्ती कोण आहे? याची खातरजमा करुन पालकांनी मुलांना शूटींगसाठी पाठवलं पाहिजे. पालकांनी मुलांची काळजी घ्यायला हवी होती, पण तसं झाले नाही,” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





