-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गावंडगाव बु येथे पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या थाटात पार पडले.
या दवाखान्याचे उद्घाटन गावंडगाव बु ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी उपसरपंच सौ. अपर्णा मोहन देशमुख, डॉ. प्रकाश भदे, प्रशांत थोरात, सौ. ममता गव्हाळे, सौ. गंगा मारोती घुगे, धनराज गावंडे, प्रशांत मधे, जयश्री गजानन फसाले, ममता दिपक गव्हाळे तसेच गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
मूळतः या दवाखान्याचे लोकार्पण खासदार बळवंत वानखडे व आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सरपंच सुनील थोरात यांनीच ग्रामस्थांसह या दवाखान्याचे उद्घाटन करून सोहळा उत्साहात साजरा केला.
यावेळी सरपंच थोरात म्हणाले, “या दवाखान्याच्या उभारणीसाठी बाळासाहेब हिंगणीकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या पाठबळामुळे गावातील पशुपालकांना तातडीने पशुवैद्यकीय सेवा मिळणार आहेत.”
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत गावंडगाव बु तर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी दवाखान्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






