-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता ‘युनिटी वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेला विमलाबाई देशमुख सभागृहातून सुरुवात होणार असून युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या पदयात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज तयारी बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तसेच राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, आरोग्य विभाग आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.
‘मेरा युवा भारत’ व केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या वतीने सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘सरदार @ १५०’ एकता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर आयोजित पदयात्रा विमलाबाई देशमुख सभागृहातून सुरू होऊन पंचवटी चौक, इर्विन चौक मार्गे पार पडणार आहे. इर्विन चौकात पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पदयात्रा गर्ल्स हायस्कूल चौकातून निघून पुन्हा विमलाबाई देशमुख सभागृहात समारोप होईल.
पदयात्रेत सहभागी होण्यासाठी ‘माय भारत पोर्टल’वर नोंदणी आवश्यक असून, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, खेळाडू, पोलिस भरतीतील युवक आणि विद्यार्थी यांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी पोलिस परवानगी घेणे, महापालिकेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, तसेच आरोग्य विभागाने आरोग्य पथक तैनात ठेवणे याबाबत जिल्हाधिकारी येरेकर यांनी सूचना दिल्या. तसेच, नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पदयात्रा आयोजनात कोणताही भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






