-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी आणि कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्राच्या ध्येयासाठी निर्णायक ठरणारी जिल्हास्तरीय समन्वय समितीची महत्त्वपूर्ण सभा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध अभियानाला प्रभावी दिशा देण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कुष्ठरोग निर्मूलनासाठी सर्वसमावेशक, संगठित आणि संवेदनशील पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सद्यस्थिती तरलपणे मांडत आगामी अभियानाचे सुसूत्र नियोजन सादर केले. जिल्हाधिकारी येरेकर यांनी “कुष्ठरुग्णांचा लवकर शोध घेणे हेच या रोगाशी लढण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे” असे प्रतिपादन करत सर्व विभागांनी आणि जनतेने सहभाग, सहकार्य आणि संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी जनजागृतीचे जाळे अधिक व्यापक करण्याची गरज अधोरेखित केली. “समाजातील संसर्गसाखळी खंडित करण्यासाठी आरोग्ययंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी सामूहिकपणे झटले, तर सन 2027 पर्यंत ‘शून्य प्रसार’ हे ध्येय साध्य होऊ शकते,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने जिल्ह्यातून निघालेला हा दृढनिश्चयी मार्ग, पुढील काळात आरोग्यसुरक्षेची नवी परंपरा घडविणारा ठरेल, अशी आशा यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






