-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शहरात झालेल्या भीषण दुर्घटनेत तौफिक शेख अब्दुल रफीक (वय 32, रा. शनिवारा) या मेहनती तरुणाचा विजेच्या जिवंत तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने अंजनगाव सुर्जी हादरून गेले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मोहम्मद तौफिक उस्मान नगर, बुधवारा येथे सुरू असलेल्या घराच्या रंगकामाचे काम पाहत होता. सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान तो कामात गुंतलेला असतानाच घराच्या शेजारील धोकादायकरीत्या खाली झुकलेल्या जिवंत तारेला त्याचा स्पर्श झाला. क्षणात बसलेल्या जबर विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. लोकांच्या हाका-आरवात घटनास्थळी हळहळ व भीतीचे वातावरण पसरले.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित विजेची तारे गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीपासून अवघ्या सहा फुटांवर लोंबकळत होत्या. या बाबत वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनीने कोणतीही हालचाल न केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. “निष्काळजीपणाच्या या ढिसाळ व्यवस्थेमुळे एका तरुणाचा जीव गेला. अजून किती बळी घेतल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
तौफिकच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा महासागर कोसळला आहे. शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून घटनास्थळी दबाव वाढू लागला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून वीज वितरण कंपनीतील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






