घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यप्रदेशातील खाडा फलिया गावातून अटक करून मुद्देमाल जप्त केला. तसेच त्यांनी शहरातील पाच घरफोडीच्या घटनांची कबुली दिली.
राकेश केरमसींग बमनिया (वय २७) आणि भवरसींग सोमला बमनिया (वय ३३) दोन्ही रा. खाडा फालिया, बडीउटी, कंडलवासा, अलीराजपूर, मध्यप्रदेश अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. तर रमेश नरसिंह चव्हाण उर्फ भिलाला (रा. पिंपलदलीया, तांडा जि. धार, मध्यप्रदेश) व रोहीत भांगडीया मावी खाडाफलीया, बडीउटी, कुंडलवासा, आलीराजपूर, मध्यप्रदेश) अशी पसार आरोपींची नावे आहेत.
शहरात मागील काही दिवसांत चोरी व घरफोडीच्या घटना सातत्याने उघडकीस आल्या होत्या. दरदिवसाला चोऱ्या होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आपआपल्या परिसरात रात्रीची गस्त सुरू केली होती. तरीसुध्दा चोरीचेप्रमाण कमी झाले नाही. उलट ८ ते १० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने प्रत्येक घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता चार युवक एका घरात चोरी करतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आणि बारकाईने पाहणी केली असता चारही युवक मध्यप्रदेशातील सराईत चोरटे असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांची माहिती घेतली असता चौघेही चोरटे मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील खाडा फलिया गावातील असल्याचे समोर आले. खाडा फलिया गाव हे चोरट्यांचे गाव असून भारतातील पोलीस आरोपींच्या शोधात या गावात येतात. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक पाच दिवसांपासून गावात ठिय्या मांडून होते. रविवारी राकेश बमनिया गावात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या मदतीने भवरसिंग बमनिया याला अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरात पाच ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलिसांना सांगितले.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, अनिकेत’ कासार (सायंबरे), प्रियंका कोटावार (सायबर), अंमलदार सतीश देशमुख, गजानन ढेवले, फिरोज खान, मनोज ठोसर, संग्राम भोजने, मिर्झा नईम बेग, विकास गुडधे, रंजीत गावंडे, योगेश पवार, संदीप खंडारे, प्रभात पोकळे, सुषमा आठवले (सायबर) यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





