अमरावती : मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरकडून घनकचरा व्यवस्थापन सुरू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी अमरावती महानगरपालिकेने उल्हासनगर (ठाणे) येथील मे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, या कंपनीची निवड केली असून या कंपनीने सोमवारपासूनच (१ डिसेंबर २०२५) प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाने स्वच्छता ही निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कंत्राटानुसार शहरातील पाचही झोनमधून संकलित झालेला कचरा आकोली व सुकळी येथील प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचवणे हे नियमित काम मे. कोणार्क कंपनी करणार आहे. तसेच भविष्यात प्राथमिक संकलनाचे (द्वार-द्वार संकलन) काम बंद पडल्यास आपत्कालीन स्थितीत तेही काम कंपनीकडे सोपवले जाईल.

सध्या कंपनीने ५ मोठी रिफ्यूज कॉम्पॅक्टर वाहने (१४ घनमीटर), जेसीबी मशिन्स तसेच आवश्यक मनुष्यबळ शहरात तैनात केले आहे. पूर्ण क्षमतेने काम सुरू झाल्यावर कंपनीकडे २७ हून अधिक मोठी वाहने व ५४ कर्मचारी तसेच गरज पडल्यास ५१८ वाहने व १२५१ कर्मचारी उपलब्ध असतील.

पूर्वी हे काम मे. पूजा कन्स्ट्रक्शन कंपनी करीत होती. त्यांचा करार संपुष्टात आल्याने नवीन निविदा काढण्यात आली. नागपूर, इंदूर आदी शहरांच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून अमरावतीत एकात्मिक प्राथमिक-द्वितीयक वहन पद्धत लागू करण्यात येत आहे. निविदेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल असूनही न्यायालयाने काम थांबविण्याचा कोणताही स्थगनादेश दिलेला नाही, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुसूत्रता यावी व नागरिकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. पुढील काही दिवसांत नवीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!