-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : सार्वत्रिक निवडणूक २०२५ नंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात अंजनगाव सुर्जी शहरात लोकशाही परंपरा, परस्पर सन्मान आणि सहकार्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. आमदार गजानन लवटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित विशेष सत्कार समारंभात विविध पक्षांचे नवनिर्वाचित नगरसेवक एकत्र आले आणि शहराच्या प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्नांचा संदेश दिला.
या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सात तसेच समाजवादी पार्टीचे दोन असे एकूण नऊ नगरसेवकांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींचा सन्मान करताना मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाची जाणीव आणि जबाबदारीचे भान जपण्याचे आवाहन करण्यात आले.
सत्कारप्राप्त नगरसेवकांमध्ये सुयोग उत्तमराव खाडे, सुधीर देवगिरे, गजानन विजेकर, मो. रेहान अब्दुल मुनाफ, श्रीकांत मोहनराव जुनघरे, भास्कर बाळे, अविनाश ज्ञानेश्वरराव ढेंगे, आबेदा बी. मो. आरीफ आणि इब्राहीम बेग हसनबेग यांचा समावेश होता. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात नवनिर्वाचित प्रतिनिधींचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात बोलताना नगरसेवकांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच नागरी सुविधा सुधारण्यावर भर देत पारदर्शक व नागरिककेंद्रित प्रशासन राबविण्याचे आश्वासन देण्यात आले.
या समारंभाला शिवसेना व युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी समन्वय व सहकार्याच्या माध्यमातून अंजनगाव सुर्जीच्या प्रगतीसाठी काम करावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






