जळगाव : शहरातील शिरसोली रस्त्यावरील नामांकित गुलाबराव देवकर महाविद्यालयातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अवघ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा महाविद्यालयात असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महिमा चंदन वासनिक (वय १९) असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, महिमा वासनिक ही मूळची भंडारा जिल्ह्यातील रहिवासी होती आणि ती जळगावातील गुलाबराव देवकर महाविद्यालयात नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत होती. रविवारी, २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ती महाविद्यालयात असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही समजण्याच्या आतच तिला जोरदार चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली.
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली महिमा खाली पडताच तिच्या सहकाऱ्यांनी आणि महाविद्यालय प्रशासनाने तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासाअंती तिला मृत घोषित केले. धडधाकट दिसणाऱ्या महिमाचा असा अचानक मृत्यू झाल्याने तिच्या मित्र-मैत्रिणींना मोठा धक्का बसला आहे.
परिसरात शोककळा महिमा ही शिक्षणाच्या जिद्दीने विदर्भातील भंडारा येथून जळगावात आली होती. मात्र, नियतीचा हा क्रूर खेळ तिच्या स्वप्नांचा अंत करणारा ठरला. तिच्या निधनाची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून, या घटनेमुळे वासनिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. एका होतकरू विद्यार्थिनीचा असा अंत झाल्याने जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





