शहानूर जलशुद्धीकरण केंद्रात सुधारणा कामे; १५६ गावे व दोन शहरांचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
अंजनगाव सुर्जी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या १५६ गावांसह दोन शहरांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. जीवनदायी ठरलेल्या शहानूर जलशुद्धीकरण केंद्रात अत्यावश्यक तांत्रिक देखभाल आणि सुधारणा कामे हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार, दि. २ जानेवारी २०२६ ते शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ या दोन दिवसांत संपूर्ण प्रादेशिक योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (मजीप्रा) मिळालेल्या माहितीनुसार, शहानूर जलशुद्धीकरण केंद्रातील साठवण टाकीला ६०० मी.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी जोडणे, मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह बदलणे तसेच यंत्रणेतील इतर महत्त्वाच्या तांत्रिक दुरुस्ती व सुधारणा या कालावधीत करण्यात येणार आहेत. या कामांमुळे भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत, सुरक्षित आणि दीर्घकालीनदृष्ट्या सक्षम होणार असल्याचे मजीप्रा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या दोन दिवसांत शहानूर जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असल्याने संपूर्ण प्रादेशिक योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये व दोन्ही शहरांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरत्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
नागरिकांची अडचण कमी व्हावी यासाठी मजीप्राने आगाऊ सूचना देत पाणी साठवण करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच या कालावधीत उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने करावा, अनावश्यक वापर टाळावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दीर्घकालीन हितासाठी ही कामे अत्यावश्यक असून, नियोजित कालावधीत कामे पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही माहिती उपविभागीय अभियंता विजय शेंडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल व्यवस्थापन उपविभाग, दर्यापूर यांनी दिली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!