-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : ज्ञान, संस्कार आणि संवाद यांच्या संगमातून घडणाऱ्या सुदृढ समाजाच्या संकल्पनेला मूर्त रूप देणारा ‘पालक–विद्यार्थी परिसंवाद’ सुरवाडी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत उत्साहात पार पडला. अक्षर मानव अमरावती जिल्हा कार्यकारिणीच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरले ते अक्षर मानवचे महाराष्ट्र राज्य नियंत्रक श्री. आझाद खान, ज्यांच्या विचारपूर्ण आणि जिवंत मार्गदर्शनाने उपस्थितांना अंतर्मुख केले.
शाळेचे मुख्याध्यापक दलवीर व्यास सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘पालक-बालक घडवू या आणि सुसंस्कारित समाज उभारू या’ या संकल्पनेवर आधारित परिसंवादात श्री. आझाद खान यांनी पालकत्वाच्या मूलभूत जबाबदाऱ्यांवर प्रभावी भाष्य केले. “मुलांना घडवायचे असेल तर घरात पुस्तकांचा सुगंध हवा, संवादाची ऊब हवी आणि आचरणात शिस्त हवी,” असे सांगत त्यांनी प्रत्येक घरात छोटेखानी वाचन संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन केले. समाज, राष्ट्र आणि जग समजून घेण्यासाठी वाचनाचे भान आणि विचारांचे भांडार समृद्ध असणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
अक्षर मानव संस्थेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक उपक्रमांची माहिती देताना श्री. खान यांनी सांगितले की राज्यातील नामवंत मार्गदर्शक थेट ग्रामीण भागात येऊन विद्यार्थ्यांना दिशा देतील. सुरवाडी-तिवसा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या भाषणातील स्पष्टता, अभ्यासपूर्ण दृष्टी आणि संवेदनशीलता यामुळे सभागृहात प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.
नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. यमुना नाखले यांनी पालक व मुलांमधील भावनिक अंतर कमी करण्यासाठी संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. मुलांच्या स्वभाववैशिष्ट्यांची जाण ठेवून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मानव संसाधन समुपदेशक सौ. मेघना कोडपे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सकारात्मक वातावरणाची गरज स्पष्ट केली.
अक्षर मानव अमरावती जिल्हा सचिव सौ. अश्विनी वितोंडे-खान यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम सांगत पालकांना सजग राहण्याचे आवाहन केले. मुलांवर मोबाईलचा वाढता प्रभाव, त्यातून निर्माण होणाऱ्या शारीरिक व मानसिक अडचणी यावर त्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. पालकांनी स्वतःच्या सवयी बदलल्याशिवाय मुलांमध्ये बदल घडणार नाही, हा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला.
कार्यक्रमात कवयित्री प्रांजली अत्राम, शिक्षण विभागाचे विभाग अध्यक्ष राजेश डहाके, कोषाध्यक्ष अनिल मेंढे, माजी नायब तहसीलदार यशोदा अत्राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे शाळा परिसरात शैक्षणिक आणि सामाजिक जाणीवांची नवी चेतना निर्माण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन मुख्याध्यापक दलवीर व्यास सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संध्या जामकर मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका आणि अक्षर मानवच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुरवाडी खुर्दमध्ये घडलेला हा परिसंवाद केवळ कार्यक्रम न राहता, कुटुंब आणि समाज घडविण्याच्या सामूहिक संकल्पनेचा प्रेरणादायी आरंभ ठरला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






