मराठी फेरीवाला विरुद्ध परप्रांतीय फेरीवाल्यांमुळं डोंबिवली पुन्हा चर्चेत, मनसे आली धावून

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाला प्रश्न आणि मराठी माणसांवरील कथित अन्यायाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे.

 

ठाणे : एका इंस्टाग्राम पोस्टची दखल घेत राज ठाकरे यांनी मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना डोंबिवलीत पाठवलं. डोंबिवलीमध्ये खाद्यपदार्थाचा गाडा चालवणाऱ्या तरुणीला न्याय देण्यासाठी अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल झाले. विशेष म्हणजे डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी मेहरबान आहेत. तर दुसरीकडं मराठी फेरीवाल्या तरुणीवर कारवाई करून अन्याय केला जातोय. महानगरपालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनाश जाधव आक्रमक झाले होते.

व्हायरल व्हिडिओ राज ठाकरेंनी पाहिला अन्… : एकता सावंत ही उदरनिर्वाहसाठी डोंबिवली रेल्वे स्थानका बाहेर खाद्यपदार्थाची गाडी लावते. विशेष म्हणजे एकता ही रील स्टार असून तिचे हजारो फोलोओर्स आहे. तिनं तिच्यासोबत घडलेला प्रसंग मोबाइलमध्ये कैद करून तो व्हिडिओ व्हायरल केला. तोच व्हिडिओ 8 ते 9 कोट्यावधी नेटकऱ्यांनी पाहिला. त्यामध्ये राज ठाकरे यांचाही समावेश आहे. याच व्हिडिओमुळं हा प्रकार समोर आला.

 

डोंबिवलीत फेरीवाला आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर : डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाला प्रश्न आणि मराठी माणसांवरील कथित अन्यायाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. मराठी तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव थेट डोंबिवलीत दाखल झाले. यावेळी त्यांनी महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला. डोंबिवलीमध्ये एक मराठी तरुणी व्यवसायकरत असून महानगरपालिकेकडून केवळ तिच्याच गाडीवर वारंवार कारवाई केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

फेरीवाल्यांकडून अधिकारी घेतात 300 रुपये हप्ता : स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात असलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांना मोकळं रान दिलं जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. या प्रकरणात हस्तक्षेप करत अविनाश जाधव डोंबिवलीमध्ये येताच परिसरातील फेरीवाल्यांनी धावपळ केली. मनसे पदाधिकारी रस्त्यावर उतरताच अनेक फेरीवाले आपली गाडी घेऊन पसार झाल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दरम्यान, संबंधित मराठी तरुणीनं माध्यमांसमोर आपली खंत व्यक्त करताना गंभीर आरोप केले. माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेऊनही महानगरपालिकेनं माझ्यावरच कारवाई केली जाते. तर इतर फेरीवाल्यांकडं जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप एकता सावंतनं केलाय. त्यामुळं महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत.

 

…आणि मराठी विरुद्ध परप्रांतीय : मनसे नेते अविनाश जाधव यांनी यावेळी स्पष्ट भूमिका घेत सांगितलं की, “व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही ठामपणे पाठीशी आहोत. मराठी माणसावर अन्याय सहन केला जाणार नाही. महानगरपालिकेच्या या दुटप्पी धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल.” या घटनेनंतर डोंबिवलीत फेरीवाला धोरण, हप्ता वसुली आणि मराठी विरुद्ध परप्रांतीय असा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, पुढील काळात या प्रकरणावरून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी : या घटनेनंतर एकता सावंत या तरुणीशी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी संवाद साधला. तिच्या पाठीमागं संपूर्ण शिवसेना आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरेंचा फोटो लावून मला तरी टपरी द्या : परप्रांतीयांना टपऱ्या टाकायला परवानगी मिळते. मग आम्ही मराठी आहोत म्हणून आमच्यावर अन्याय का ? असा थेट सवाल करत तरुणीनं मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. मला तुम्ही टपरी टाकून द्या, त्यावर राज ठाकरे यांचा फोटो लावून द्या, अशी भावनिक मागणी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या समोर तरुणीनं रोजगार, संधी आणि मराठी माणसांवरील कथित दुजाभावाबाबत आपली खदखद व्यक्त केली.

फेरीवाल्यांची पळापळ : मराठी तरुणांना व्यवसाय, टपरी, रोजगार मिळताना अडचणी येतात. मात्र परप्रांतीयांना सहज परवानगी मिळतात, असा आरोप एकता सावंत हिनं केला. तरुणीचे म्हणणे ऐकून घेत अविनाश जाधव यांनी तरुणीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठी विरुद्ध परप्रांतीय या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आज फेरीवाला हटाव कारवाई दरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. या कारवाईमुळं बेकायदा फेरीवाल्याची पळापळ झाली होती.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013505
error: Content is protected !!