बार्शीत भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. तर दोन्ही राष्ट्रवादीचा या दोन्ही शिवसेनेच्या युतीला पाठिंबा मिळाला आहे. आमदार दिलीप सोपल यांनी माहिती दिली.
सोलापूर – जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बार्शीत भाजपाला रोखण्यासाठी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपाचे आमदार राजेंद्र राऊत यांचं नगरपरिषद आणि बाजार समितीतील यश बघता त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रोखण्यासाठी बार्शीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं स्थानिक पातळीवर युती केली आहे. या युतीला राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षानं पाठिंबा दिला आहे. मात्र, ही युती शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आंधळकर यांना मान्य नाही. भाऊसाहेब आंधळकर यांनी ही अभद्र युती असल्याची टीका केली आहे.
शिंदे शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांचा विरोध – बार्शी तालुक्यात दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजपाच्या विरोधात एकत्र आल्याचं समजताच टीका सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे बार्शीचे स्थानिक नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषद घेत या युतीचा समाचार घेतला. विशेष म्हणजे, या युतीच्या प्रचार पत्रकावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे फोटो पहिल्या क्रमांकावर आहेत. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा फोटो तिसऱ्या क्रमांकावर लावण्यात आला आहे. या प्रकारामुळं शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, तळपायाची आग मस्तकात गेल्याची प्रतिक्रिया आंधळकर यांनी दिली आहे.
गद्दार म्हणून हिणवले आणि त्यांच्यासोबत युती – “ही अत्यंत दुर्दैवी आणि अभद्र युती बार्शीमध्ये झालेली आहे. ज्यांनी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना ‘५० खोके, एकदम ओके’, ‘गद्दार’ अशा शब्दांत हिणवलं, त्यांच्यासोबतच ही युती? आणि पत्रकावर आमच्या साहेबांचा फोटो तिसऱ्या क्रमांकावर? याचा मी जाहीर निषेध करतो.” अशा शब्दात आंधळकरांनी या युतीवर टीका केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





