“दादांची इच्छा, विलीनीकरण, अपघातातील शंका; 10 आणि 12 तारखेला सर्व उघड करणार”, रोहित पवारांची रोखठोक भूमिका

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रोहित पवार यांनी आगामी 10 आणि 12 तारखेला महत्त्वाचे खुलासे करणार असल्याचे जाहीर केलंय. रोहित पवारांनी मतदान केल्यानंतर ते बारामतीत बोलत होते.

 

 

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी, पवार कुटुंबातील भूमिका, अपघातासंदर्भातील शंका आणि संभाव्य विलीनीकरण यावर रोहित पवार यांनी प्रथमच सविस्तर आणि सूचक वक्तव्य केलंय. पक्षावर बोलण्याचा अधिकार नसला तरी भावनिक अधिकार नक्की आहे,” असे स्पष्ट करत रोहित पवार यांनी आगामी 10 आणि 12 तारखेला महत्त्वाचे खुलासे करणार असल्याचे जाहीर केलंय. रोहित पवारांनी मतदान केल्यानंतर ते बारामतीत बोलत होते.

आमच्या मनात अनेक शंका : सुनील तटकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, “मला पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसेल, पण दादांनी मला आणि काही जवळच्या लोकांना जे सांगितले होते, त्यावर बोलण्याचा मला भावनिक अधिकार आहे.” सर्व राजकीय लोक जवळचे असतातच असे नाही, आम्ही भावनिक आहोत आणि भावना व्यक्त करणार, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. बजरंग सोनवणे यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “आमच्या मनात अनेक शंका आहेत. काही गोष्टी समोर येऊ शकतात.” 10 तारखेला मुंबईत सादरीकरण (प्रेझेंटेशन) करून सीसीटीव्हीपासून इतर सर्व बाबींवर भाष्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपघात कसा आणि का घडला, याबाबत संपूर्ण राज्यात शंका असल्याचेही त्यांनी मान्य केले.

दादांची मनापासून इच्छा होती की परिवार एकत्र राहावा : मतदानाच्या अनुभवावर बोलताना रोहित पवार भावनिक झाले. “ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला, त्या दिवसापासून मी याच मतदान केंद्रावर मतदान करतोय. आज मतदान करताना दादांसोबत झालेल्या चर्चा आठवल्या. कार्यकर्त्यांची निवडणूक महत्त्वाची असून, जास्तीत जास्त विचाराचे कार्यकर्ते निवडून यावेत, हीच दादांची इच्छा होती,” असे ते म्हणाले. पवार कुटुंबाबाबत बोलताना रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, “दादांची मनापासून इच्छा होती की परिवार एकत्र राहावा. आजही आम्ही एकत्र आहोत आणि तसेच राहण्याचे प्रयत्न सुरू ठेवू.” सध्या कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसून 9 तारखेनंतरच त्यावर चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले.

मी राजकीय आरोप करणार नाही : पार्थ पवार, शरद पवार यांच्यातील व्हिडीओबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, हे भावनिक मार्गदर्शन असून दादांच्या स्मरणार्थ काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. यावर काल सविस्तर चर्चा झाली असून शरद पवार वेळोवेळी मार्गदर्शन करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या ‘यू-टर्न’वर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे. 12 तारखेला विलीनीकरणाबाबत नेमकं काय घडलं, दादांची नेमकी इच्छा काय होती, हे मी पत्रकार परिषदेत स्पष्ट करेन. मात्र मी राजकीय आरोप करणार नाही.”

सर्व 12 तारखेला उघड करणार : विलीनीकरणाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ते का आणि कशासाठी होणार होते, त्यामागे राजकीय की भावनिक कारण होते, हे सर्व 12 तारखेला उघड करणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत रोहित पवार म्हणाले, “सुनेत्रा काकींमध्ये मला अजित काका दिसतात. दादांची जी पोझिशन होती, तीच पोझिशन सुनेत्रा पवारांना मिळावी, ही आमची इच्छा आहे.” अमोल मिटकरी यांच्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “ते दादांचे जवळचे कार्यकर्ते होते. काही गोष्टी ते योग्य पद्धतीने मांडत आहेत, तर काही विषयांवर भावनिक झालेत. त्या भावनिकतेमुळेच लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून, त्यावर मी सादरीकरणातून उत्तर देणार आहे.” रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, 10 आणि 12 तारखेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

012818
error: Content is protected !!