मुलींनी व सुनेनी खांदा देत आईला दिला अखेरचा निरोप!
अमरावती : अंजनगाव सुर्जी येथील मराठा सेवासंघाचे माजी तालुकाध्यक्ष किशोर दादाराव सावरकर यांच्या आई सूर्यकांताबाईचे 19 जानेवारीला वृद्धापकाळाने निधन झाले. निधनानंतर कोणतेही सोपस्कार न करता किशोर सावरकर यांनी आईच्या इच्छेनुसार देहदान दिल्याने एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांचा देह डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजला देण्यात आला.
नवीन विचार समाजाला दिल्याची भावना व्यक्त!
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कोकर्डा येथील रहिवाशी सावरकर कुटूंब पूर्वीपासूनच पुरोगामी विचाराची कास धरणारे म्हणून ओळखले जाते. किशोर सावरकर हे अनेक वर्षे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष होते. किशोर सावरकर यांच्या आईने स्वतःहून देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. हे विशेष. जवळच्या नात्यातील व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी किंवा अंत्यसंस्कार करताना कुटुंबीय अतिशय संवेदनशील असतात. सावरकर कुटुंबियांनीदेखील जुन्या रुढी, परंपरा आणि कर्मकांडांना फाटा देत निधन झालेल्या आईचे मरणोत्तर देहदान केले. इतर ठिकाणी कुटूंबातून होणारा विरोध बघायला मिळतो; परंतु अंत्ययात्रेवेळी किशोर यांच्या बहिणी आणि पत्नी यांनी खांदा दिल्याने एक नवीन पायंडा आणि नवीन विचार समाजाला दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
सावरकर कुटूंबांचे सर्वच स्तरातून कौतूक!
सावरकर यांच्या कुटूंबातील हे दुसरे देहदान असून मृत्यूनंतर देह हा जाळून, पुरुन नष्ट करण्यापेक्षा तो शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून देणे, हे खऱ्या अर्थाचे सामाजिक भान आहे. कुटुंबातील या विचारामुळे अनेक चांगले डॉक्टर निर्माण होतील आणि येणाऱ्या पिढीसाठी त्याचा उपयोग होईल, असे विचार यावेळी श्रध्दांजली व्यक्त करताना मान्यवरांनी काढले. तेरवी आणि इतर कार्यक्रमासाठी लागणारा खर्च कोकर्डा येथील एखाद्या सामाजिक कामासाठी देण्याचा व देहनानंतर कोणतेही कर्मकांड न ठेवता आजच दुखवटा संपल्याचे जाहीर केल्याने सावरकर कुटूंबांचे सर्वच स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






