
षोडशी असुरक्षित !
पोक्सो, विनयभंगाचे तब्बल आठ एफआयआर, शाळकरी मुलींचा पाठलाग, छेड
अमरावती : १३ ते १७ वर्षे वयोगटातील शाळकरी मुली असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत अल्पवयीन मुलीवरील बलात्कारासह पोक्सोचे तीन एफआयआर नोंदविण्यात आले, तर विनयभंगाच्या एकूण आठ एफआयआरमधील तीन घटना या अल्पवयीन मुलींशी निगडित आहेत.
दर्यापूर पोलिस ठाण्यात बलात्कार व पोक्सोचे दोन गुन्हे, तर चांदूर रेल्वेत १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी, शरीरसंबंधांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याबाबत एक असे तीन गुन्हे ४ फेब्रुवारी रोजी उघड झाले. १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी आरोपी सूरज माल्टे (२३, अचलपूर) विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीने त्या सायकलस्वार विद्यार्थिनीचा शाळेत ये जा करत असताना पाठलाग केला.
मुलगी १५ वर्षांची, प्रेमप्रकरण दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा अन्य एक एफआयआर चांदूर रेल्वे ठाण्यात ४ फेब्रुवारी रोजी नोंदविला गेला. पीडिता ही केवळ १५ वर्षांची आहे. कार्तिक कोहरे (२१, रा. यवतमाळ) याने तिच्याशी शारीरिक संबंध बनवताना फोटो काढले.
ते फोटो आरोपीने ३ फेब्रुवारी रोजी पीडितेच्या आईला पाठविले. ते दोघे शाळेत शिकत होते. दोन वर्षांपासून ते प्रेमप्रकरण होते. माझ्याशी बोलली नाहीस तर ते फोटो इन्स्टावर पोस्ट करण्याची धमकी तिला देण्यात आली.
दत्तापूर, परतवाड्यात दोन गुन्हे दत्तापूर पोलिसांनी ३ फेब्रुवारी रोजी धीरज वहिले (२०) विरुद्ध १५ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गुन्हा नोंदविला. परतवाडा पोलिसांनी एका १७ वर्षीय मुलीचा पाठलाग व छेड प्रकरणी चेतन धोटे (२५, येणी पांढरी) विरुद्ध पोक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
गेल्या २४ तासांत दर्यापूर व चांदूर रेल्वे पोलिसांनी बलात्कार व पोक्सोचे तीन गुन्हे नोंदविले. विनयभंगाचेदेखील आठ एफआयआर नोंदविले गेले.
विशाल आनंद, पोलिस अधीक्षक
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





