
अमरावती : शासकीय किमान आधारभूत हमीभावानुसार नाफेडमार्फत केलेल्या सोयाबीन खरेदीमध्ये अनियमितता असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) ने केला आहे. मंगळवारी यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन तक्रार दाखल करत न्याय देण्याची मागणी केली.
अमरावती खरेदी- विक्री संस्था ही विदर्भको-ऑप. मार्केटिंग फेडरेशनची सब एजन्ट संस्था म्हणून कार्यरत होती. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संस्थेने सोयाबीनची खरेदी केलीः मात्र त्याचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. चुकारे का मिळाले नाहीत, याची चौकशी काही शेतकऱ्यांनी केली असता त्यांना खरेदीबाबत प्रचंड अनियमितता असल्याचे दिसून आले. यात आर्थिक घोटाळा झाल्याचीही शक्यता आहे. मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट देऊन तक्रार दाखल केली असून दोषींवर कारवाई करून शेतकऱ्यांना व्याजासहीत पेमेंट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेशबंड, कृऊबासचे उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ, अमरावतीचे तालुकाप्रमुख नितीन हटवार, रामदास बैलमारे, विजय तुळे, सौरभदेशमुख, सुरेश गिरी, मयूर गव्हाणे, प्रमोद वाघ, पंडित ठाकरे, नीलेश पारडे, रणजीत जगताप आदींचा समावेश होता.
.…..अन्यथा ‘खविसं’चे कार्यालय फोडणार सोयाबीन विकल्यानंतरही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळालेला नाही. ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना बँकांचे कृषी कर्ज भरावयाचे आहे. ते न भरल्यास विनाकारण व्याजाचा भुर्दंड सोसावा लागणार असून, तातडीने चुकारे करावे, अशी आग्रही भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी घेतली आहे. येत्या तीन दिवसांत प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही, तर अमरावती खरेदी-विक्री संघाचे कार्यालय फोडून टाकू, असा इशारा जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी दिला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





