
अमरावती : मंदिराची घंटा चोरल्याचा आळ घेऊन करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत ५० वर्षीय गृहस्थाचा मृत्यू झाला. २४ ते २५ मार्चदरम्यान बहिरम ते बैतूल रोडवरील अडना नदीच्या पुलाजवळ व एका मंदिराच्या मागील बाजूने तो प्रकार घडला. शेख अफसर शेख समद (५०, रा. कारंजा बहिरम, ता. चांदूर बाजार), असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा पुतण्या शेख इर्शाद शेख रऊफ (३०, कारंजा बहिरम) याच्या तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिसांनी आरोपी दिनेश निरंजन दंडे (२४, रा. इंदिरानगर, करजगाव) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. आरोपी दिनेश दंडे हा तुझ्या काकाला मारहाण करीत असल्याची माहिती गावातीलच एकाने फिर्यादीला फोनहून दिली होती.
शेख इर्शाद याने आरोपीचा शोध घेतला असता, तो शेख अफसर यांना धुनीवाले बाबाचे मंदिरामागे काठीने मारहाण करताना दिसला. त्यावर आरोपीला विचारले असता, त्याने तुझ्या काकाने मंदिराची घंटा चोरली म्हणून मारत असल्याचे शेख इर्शादला सांगितले. त्यानंतर फिर्यादीने काका शेख अफसर यांना उपचारासाठी अचलपूर येथे आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्या दरम्यान आरोपी अडना नदीकडे पळून गेला. झालेल्या मारहाणीच्या धसक्यामुळे आपले काका मरण पावले, अशी तक्रार इर्शादने नोंदविली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





