अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शाखेच्या वतीने निवेदनाद्वारे मागण्यांचा आग्रह
परभणी/जिंतूर :- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयी-सुविधांचा गंभीर अभाव असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून सातत्याने मागणी करूनही त्यांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जात आहेत. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परभणी शाखेच्या वतीने महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या समस्या:
महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोल्यांना खिडक्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वसतिगृह आणि महाविद्यालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. वसतिगृहातील स्वच्छतागृहात लाईट नाहीत, परिणामी विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याहून गंभीर म्हणजे, स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर नैसर्गिक विधी उरकावी लागते.
शैक्षणिक सुविधांची दुरवस्था:
महाविद्यालयातील वर्कशॉप धूळखात पडले असून प्रात्यक्षिके नियमितपणे घेतली जात नाहीत. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. त्याशिवाय, महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक उपलब्ध नाहीत. नांदेडहून प्राध्यापक येऊन शिकवतात, यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या संतापाचा इशारा:
वसतिगृहात खानावळ सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना जेवणासाठी शहरात पायपीट करावी लागते. या समस्यांचा त्वरित निपटारा न झाल्यास विद्यार्थी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा अभाविप परभणी शाखेने दिला आहे. या वेळी देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, जिल्हा संयोजक मुकेश भंडारे , महाविद्यालय अध्यक्ष सुमित शिंदे, विशाल देगावकर, श्रीनिवास उईके तसेच अन्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मुलभूत गरजांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हे अत्यंत गंभीर असून, या समस्यांची तातडीने दखल घेऊन उपाययोजना न केल्यास प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा ठाम इशारा देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे यांनी दिला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





