योजना सुरू करणारे जिल्हा स्त्री रुग्णालय बनले होते राज्यातील पहिले रुग्णालय
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे बाळ जन्मतःच त्याचे आधारकार्ड काढण्याची योजना सुरू केली होती. ही योजना रुग्णालय प्रशासन व पोस्ट ऑफिसच्या मदतीने सुरू
करण्यात आली होती; परंतु दोन वर्षापासून या योजनेला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. रुग्णालयात आधारकार्ड काढून देण्यासाठी पोस्ट ऑफिसचे कर्मचारीच येत नसल्याने डफरीनमध्ये जन्म घेतलेल्या एकाही बाळाचे आधारकार्ड निघाले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यासाठी नवजात बालकांची आधारकार्डसाठी नोंदणी करण्याची सुविधा रुग्णालयात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बाळ जन्मताच आधारकार्ड ही योजना सर्वप्रथम राज्यात जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे सुरू करण्यात आली होती. यासाठी पोस्ट ऑफिसमधील दोन कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील रुग्णालयात केली होती. ते रोज रुग्णालयात जाऊन जन्म झालेल्या नवजात शिशूचे आधारकार्ड तयार करत होते. यासाठी आई किंवा वडील दोघांपैकी एकाचे आधारकार्ड, तसेच रुग्णालयातून देण्यात येणारे बाळाचे जन्म प्रमाणपत्र यावरून हे आधारकार्ड काढण्यात येत होते; परंतु एप्रिल २०२३ पासून पोस्टातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात येणे बंद केल्याने नवजात शिशूचे आधारकार्ड काढण्याला ब्रेक लागला.
पाच महिनेच सुरू राहिली योजना जन्मतःच बाळाचे आधारकार्ड देण्याची योजना रुग्णालयात डिसेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली होती. मार्च २०२३ पर्यंत डफरीन रुग्णालयात जन्मलेल्या जवळपास ७९८ बालकांचे आधारकार्डही काढण्यात आले; परंतु पोस्टातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात येणे बंद केल्याने केवळ पाच महिनेच ही योजना सुरू राहिली.
बाळ जन्मतःच त्यांचे आधारकार्ड काढण्यात येत होते; त्यासाठी पोस्ट ऑफिसकडून येणारे कर्मचारी अचानक बंद झाले. यासंदर्भात पत्रव्यवहार देखील करण्यात आला; परंतु आधारकार्ड काढण्यासाठी कर्मचारी आले नाहीत.
डॉ. विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





