२४ तासांत खुनाच्या दोन घटना : कामनापूर, गणेशपूर येथील थरार
अमरावती : गेल्या २४ तासांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडलेल्या खुनाच्या दोन घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत व्यसनी मुलाने जन्मदात्रीला संपविले. तर दुसऱ्या घटनेत संत्रस्त झालेल्या वडिलांनी तरुण मुलाचा खून केला. महिलेच्या खुनाची घटना तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामनापूर घुसळी येथे ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ५:१५ च्या सुमारास घडली. तर, वरूड तालुक्यातील गणेशपूर येथे १ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी चारच्या सुमारास तरुण मुलाला यमसदनी पाठविण्यात आले.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील कामनापूर घुसळी येथे उषा शंकर चामलाटे (५०) यांचा ३१ मार्च रोजी दुपारी कुन्हाडीने वार करून खून करण्यात आला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी, मृताच्या १७ वयाच्या मुलाविरुद्ध १ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलाला दारू व सिगारेटचे व्यसन होते. त्यामुळे आई उषा चामलाटे या त्याला नेहमीच हटकत होत्या. ३१ मार्च रोजीदेखील त्यांनी तू सिगारेट व दारू का पितोस, अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने आईच्या डोक्यावर कुन्हाडीने वार केले. त्यांना धामणगाव रेल्वे येथून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले. उपचारादरम्यान उषा यांचा मृत्यू झाला.
१ जानेवारी ते १ एप्रिल या तीन महिन्यांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात खुनाच्या एकूण १२ घटना घडल्या आहेत. गतवर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत ती संख्या आठ अशी होती. तर गतवर्षी जिल्ह्यात ३२ खून झाले होते.
मुलाला संपविणारा वृद्ध बाप लगेचच अटकेत
दुसऱ्या घटनेत संत्रस्त वडिलांनी ४० वर्षीय मुलाच्या डोक्यावर व छातीवर कुन्हाडीने वार केले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. १ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ च्या सुमारास ती घटना घडली. सुरेश छोटेलाल बुवाडे (४०, गणेशपूर) असे मृताचे नाव आहे. गणेशपूर येथील आरोपी व फिर्यादीच्या राहत्या घरी ती घटना घडली. याप्रकरणी मृताची आई नानीबाई बुवाडे (५७) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आरोपी छोटेलाल भावजी बुवाडे (६७, रा. गणेशपूर जामठी, ता. वरूड) विरूद्ध १ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
वडील झाले होते संत्रस्त सुरेश बुवाडे हा त्याच्या वडिलांना नेहमी शिवीगाळ करत होता. तो नेहमीच अंगावर धावून येत असल्याने वडील संत्रस्त झाले होते. त्या रागाच्या भरात आपल्या पतीने मुलगा सुरेश हा झोपलेला असतांना त्याच्या डोक्यावर व छातीवर कुन्हाडीने वार करून खून केल्याचे मृताच्या आईने सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





