सौर ऊर्जा निर्मितीमधून जिल्ह्यात महिन्याला लाखो रुपयांची बचत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्ह्यात ३७.७३ मेगावॅटच्या विजेची निर्मिती, सूर्यघर योजनेला प्रतिसाद

 

धामणगाव रेल्वे : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून वीज निर्मिती केली जाते. त्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार अनुदान दिले जाते. त्यामुळे ग्राहकांचा सौर ऊर्जा निर्मितीकडे कल वाढला असून, यातून जिल्ह्यात महिन्याला लाखांची बचत होत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

छतावरच्या सौर ऊर्जा प्रकल्पात घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीज बिल शून्य होते. गरजेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये अमरावती जिल्हा आघाडीवर असून, या माध्यमातून वीज ग्राहक लाखांची बचतही करीत आहेत.

अडचणी काय ?

सौर ऊर्जेचे उत्पादन सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. ढगाळ हवामान, पावसाळा किंवा रात्रीच्या वेळेस वीज निर्माण होऊ शकत नाही. पॅनेल्सवर धूळ, पालापाचोळा, पक्ष्यांची विष्ठा जमल्यास कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

 

महिन्याला लाखोंची बचत

जिल्ह्यात ८८२९ ग्राहकांकडून सौर ऊर्जा संयंत्राद्वारे अमरावती जिल्ह्यात ३७.७३ मेगावॅटच्या विजेची निर्मिती होत आहे.

यात अमरावती ग्रामीण भाग, अचलपूर विभागाने सर्वाधिक मेगावॅटचा आकडा ओलांडला आहे.

घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज बिल शून्य होते. यामुळे अमरावती जिल्ह्यात लाखो रुपयांची बचत होत आहे.

 

काय आहे योजना ?

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॉटला ३० हजार रुपये, दोन किलोवॉटला ६० हजार रुपये आणि तीन किलोवॉटच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. जास्तीत जास्त अनुदान ७८ हजार रुपये आहे. महावितरणतर्फे ग्राहकांना नेट मीटर मोफत दिला असल्याची माहिती महावितरणने दिली.

 

सौर ऊर्जेमुळे प्रदूषण कमी आणि पर्यावरणाचे रक्षण होते. शिवाय कार्बन उत्सर्जन कमी होते. याशिवाय एकदा सौर ऊर्जा प्रणाली स्थापित केल्यावर विजेच्या बिलांमध्ये मोठी बचत होते. वीज बिलापासून मुक्ती मिळते.

दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013545
error: Content is protected !!