ब्राह्मणवाडा थडी : घाटलाडकी मार्गावर शेतात असलेल्या रेतीसाठ्याचा पंचनामा झाल्यानंतर ती घरकूल लाभार्थीना वितरित करण्याची घोषणा तहसीलदारांनी आदल्या दिवशी केली. दुसऱ्या दिवशी मालवाहू वाहन घेऊन लाभार्थी पोहोचले. मात्र, अचानक रेतीमालक उभा ठाकला. दुसरीकडे वाहनाचे भाडे नाहक द्यावे लागल्याने लाभार्थीमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सूत्रांनुसार, आ. प्रवीण तायडे हे १२ एप्रिल रोजी घाटलाडकी येथे जात असताना वाटेत ब्राह्मणवाडा थडी पोलिस ठाण्याजवळ कन्हान रेतीचा ओव्हरलोड ट्रक रात्री ९ वाजता त्यांना दिसला. त्यांनी पोलिस ठाणे गाठून ट्रकवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी आरोग्य केंद्रानजीक एमएच २७ डीटी
२३२४ क्रमांकाचा ट्रक पोलिस ठाण्यात जमा केला. त्याच रात्री दुसऱ्या ट्रकमधील कन्हान रेती घाटलाडकी रोडवरील पूर्णा प्रकल्पाच्या कालवा क्रमांक २ जवळ असलेल्या विलास दामोदर यांच्या शेतात रिती करण्यात आली. तीन दिवस झाल्यानंतरही त्या रेतीचा कुणीही मालक न आल्याने ब्राह्मणवाडा थडीचे मंडळ अधिकारी चव्हाण यांनी शेतमालक विलास दामोदर यांना पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार १५ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली. तलाठी आर.आर. खानंदे, कोतवाल विलास भिमटे, पोलिस पाटील बाळासाहेब सोनार यांनी पंचनामा करूनरेती ताब्यात घेतली. तहसीलदार राम शेळके यांनी घरकूल लाभार्थीना ती रेती वितरित करण्याचे आदेश १६ एप्रिल रोजी दिले. त्यानुसार तलाठ्यांनी ग्रामविकास अधिकारी पी. बी. देशमुख यांच्याकडून घरकूल लाभार्थ्यांची यादी मिळवून त्यांना तशा सूचना केल्या.
घरकूल लाभार्थी प्रवीण यातले, पारिसे हे भाड्याने ट्रॅक्टर करून रेती आणण्यासाठी गेले. अर्धा अधिक ट्रॅक्टर रेतीने भरल्यानंतर तेथे घाटलाडकी येथील एक इसम आला व त्या रेतीवर हक्क सांगितला. यामुळे तहसीलदारांनी घरकूल लाभार्थीना रेतीविनाच पाठविले.
बेवारस रेतीची कागदपत्रे तपासल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. घरकूलधारकांना बांधकामासाठी नदीघाटातील पाच ब्रास रेती त्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यास देण्यात येईल.
राम शेळके, तहसीलदार
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





