भाजयुमोने आंदोलनासाठी विश्रामगृहाचा केला वापर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

युवक काँग्रेसचा आरोप, जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर ठिय्या

 

अमरावती : काँग्रेस भवनावर भाजयुमो प्रदेश अध्यक्षांच्या नेतृत्वात मोर्चा नेल्याची वार्ता समजताच शहर युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्त्युत्तर देण्यासाठी एकत्र आले. मात्र, जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या परिसरात बॅरिकेटिंग करून पोलिस प्रशासनाने त्यांना अडवून धरले. यादरम्यान जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहाचा भाजयुमोने दुरुपयोग केल्याबाबत कारवाईची मागणी करीत जिल्हा परिषदेत युवक काँग्रेसने धडकून सीईओंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.

शासकीय विश्रामगृहाच्या आवारात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचासुद्धा प्रयत्न झाला.

सत्तेचा दुरुपयोग भाजयुमोने मोर्चासाठी आवश्यक साधनसामुग्रीची तसेच कार्यकर्त्यांची जुळवाजुळव जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या आवारात केली. झेंडे, बॅनर याच आवारात तयार केले, असा आरोप युवक काँग्रेसने केला.

पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ शासकीय आवारात आला. कुठलेही आरक्षण नसताना भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांना मोर्चाचे नियोजन होईपर्यंत विश्रामगृहाचे व्हीआयपी सूट उघडून दिल्याचाही आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

सीईओंनी आंदोलक, प्रसार माध्यमांना काढले दालनाबाहेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आल्यानंतर एकच गर्दी झाल्याने आंदोलकांसह वृत्तांकनासाठी गेलेल्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना बाहेर काढण्यात आले. विभागीय आयुक्तांकडे सीईओंविरोधात लेखी तक्रार प्रसार माध्यम प्रतिनिधींनी नोंदविली. यावेळी युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ, नीलेश गुहे, वैभव देशमुख, सागर कलाने, अनिकेत ढंगळे, योगेश बुंदेले, प्रसाद भगत, आशिष यादव, स्वप्नील साव, नितीन काळे, संकेत कुलट, मोहित भेंडे, शुभम बांबल, कौस्तुभ देशमुख, धनंजय बोबडे, वेदांत केने, आकाश गेडाम, आदित्य साखरे आदी उपस्थित होते.

 

केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यांच्याकडून असा सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करावे लागत आहे. आंदोलनासाठी जिल्हा परिषद विश्रामगृहाचा वापर करणाऱ्या भाजयुमो पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजे.

अॅड. यशोमती ठाकूर माजी महिला व बाल कल्याण मंत्री

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013541
error: Content is protected !!