मध्यप्रदेश वनविभागाची कारवाई
तुमसर : तुमसर तालुका सिमेलगत असलेल्या कुडवा गावापासून हाकेच्या अंतरावर शेतात पिकाची राखण करण्याकरीता झोपडीत झोपलेल्या शेतकर्यावर अचानक वाघाने हल्ला केला. त्या शेतकर्याच्या नरडीचा घोट घेत फरफटत जंगलाच्या दिशेने नेऊन त्याच्या शरीराचे लचके तोडले. सदर घटना दि.३ एप्रिल रोजी उघडकीस आल्याने राज्याच्या सिमेजवळील गावात दहशत पसरली होती. अखेर मध्यप्रदेश वनविभागाने नरभक्षी वाघाला डॉट मारून बेशुध्द करून जेरबंद केले.
तुमसर तालुक्यातील देवनारा या आदीवासी बहुल गावापासून केवळ सात किमी अंतरावर कुडवा (हेटी) येथे थरारक घटना घडली. बावनथडी नदीपलिकडे कुडवा हे गाव असून परिसर जंगलव्याप्त आहे. या परिसरात वन्यप्राण्यांसह हिंस्त्रप्राण्यांचा नेहमीच वावर दिसून येतो. या घटनेमुळे तुमसर तालुक्यातील सिमेलगतच्या तसेच मध्यप्रदेशातील नागरिकांत वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याकरीता पिंजरा ठेवण्यात आला होता. वाघाला जेरबंद करण्याची मोहीम सुरू होती. हा नरभक्षी वाघ नेहमीच भटकंती करीत असावा अशी चर्चा परिसरात होती. बावनथडी नदीपलिकडील गावात शेतशिवारात वाघाचे वास्तव्य असल्याने दोन्ही राज्यातील नागरिक, शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी यांच्यात प्रचंड दहशत निर्माण झाली असताना अखेर मध्यप्रदेश वनविभागाने वाघाला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





