प्रमुख चौकातील टपऱ्यांवर कारवाई, अपघाताला ठरू शकतात कारण
मोर्शी : स्थानिक नगर परिषद क्षेत्रात मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले अतिक्रमण बुलडोझरने काढण्यात आले. या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला.
मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेतर्फे सोमवारी सकाळी ७ पासून मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. सर्वप्रथम मोर्शी ते सिंभोरा रोडवर अतिक्रमण करून थाटण्यात आलेली भाजीपाला दुकानासह इतरही दुकाने हटविण्यात आली. यादरम्यान एसटी डेपो व महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या मध्य भागातून अप्पर वर्धा वसाहत व इतरही कॉलनी परिसराकडे जाणाऱ्या मार्गावरील हॉटेल, पानटपरी यासह इतरही अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. पंचायत समिती ते पेठपुरा मार्गावरील थाटण्यात आलेली दुकाने तसेच स्थानिक जयस्तंभ चौक येथील नगरपरिषदेच्या गांधी मार्केटच्या दुकानासमोरील भाजीपाला, फळांची दुकाने तसेच मेन जयस्तंभ चौक येथील मुख्य व्यापारीपेठेसमोर अतिक्रमण करून थाटण्यात आलेल्या फळांच्या दुकानासह इतर इतरही अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच वर्दळीच्या चौकात खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन सतत अपघाताच्या घटना घडत असल्याने तसेच दुचाकी-चारचाकी वाहने दुकानांसमोर उभी राहत असल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होत असल्याच्या तक्रारी नगरपरिषदेला वारंवार प्राप्त होत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत यांचा सहभाग अतिक्रमण काढताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, अरुण लांडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक पंकज साबळे, गोपनीय विभागाचे योगेश सांभारे, विजय वागतकर, सुनील गावडे व महिला पोलिस कर्मचारी उपस्थित होते. मुख्याधिकारी पराग वानखडे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, महिला-पुरुष कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





