अमरावती : येथील एका गृहस्थाला डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून १४.३० लाख रुपये उकळणाऱ्या आरोपीस बीड येथून अटक करण्यात शहर सायबर पोलिसांना यश आले. फैजान असद शेख (२१, रा. बिलालनगर, बीड) असे अटक आरोपीचे नाव आहे. १४.३० लाख रुपयांपैकी ४ लाख ५५ हजार ९०० रुपये हे पंजाब नॅशनल बँकेचा अकाऊंटधारक फैजान असद शेख याच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट झाले. आरोपीने ती रक्कम चेकद्वारे विड्रॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. परंतु सदर रकमेला लिन मार्क लावण्यात आला आहे.
शहरातील एका गृहस्थाला २४ एप्रिल रोजी एक कॉल आला. आपल्याविरुद्ध महिलांसंदर्भात अनेक गंभीर प्रकारच्या तक्रारी तेलगंणा पोलिसांकडे आल्याचे सांगून त्यात अटक वॉरंट जारी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा सीआयडी कमिशनर बोलत असल्याचे सांगून व्हिडीओ कॉल करण्यात आला. त्यात आपण एका नवीन गुन्ह्यातसुद्धा सामील असल्याची बतावणी त्यांच्याकडे करण्यात आली. ह्युमन ट्रैफिकिंगच्या गुन्ह्यात आपल्याला काही रक्कम मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यात आपण गुन्हेगार आहात व आपणास अटक करावी लागेल, अशी धमकी दिली. अटक करण्याची भीती दाखवून दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात हजर होण्यास सांगितले. जर तुम्हास हजर व्हायचे नसल्यास त्याला पर्याय म्हणून २५ लाख रकमेची मागणी करण्यात आली. अटक टाळण्यासाठी फिर्यादीने आरटीजीएसने १४.३० लाख आरोपींच्या खात्यात पाठविले. त्याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.
आरोपींकडून पासबुक, मोबाइल जप्त आरोपी निष्पन्न होताच पोलिस स्टेशन सायबर येथील सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार, हवालदार शैलेंद्र अर्डक, प्रशांत मोहोड, उल्हास टवलारे यांचे तपास पथक बीड येथे खाना झाले. आरोपीकडून विविध बँक अकाऊंटचे पासबुक तसेच १.२० लाख रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. सायबर पोलिसांनी मंगळवारी आरोपीला स्थानिक न्यायालयात उपस्थित करून त्याची पोलिस कोठडीदेखील मिळविली. गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व पीआय गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





