प्रवेशोत्सवानिमित्त उपक्रम, आमदार-खासदार, अधिकाऱ्यांची उपस्थिती
अमरावती : उन्हाळी सुट्टया संपल्यानंतर आता सोमवार, २३ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ६३ आणि जिल्हा परिषदेच्या दीड हजारावर शाळांसह शेकडो खासगी शाळांमध्ये सोमवारपासून किलबिल असणार आहे. शैक्षणिक सत्राच्या प्रारंभाला शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांची लगबग दिसून आली, हे विशेष.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने शैक्षणिक सत्र २०२५-२६ ला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. शाळांनी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत फुले देऊन करावयाचे आहे. त्याचप्रमाणे गावांमध्ये प्रभाग फेरीदेखील काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेचे आयोजन करणे, शाळा स्वच्छता करणे, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण आदी बाबी करावयाच्या आहेत. शैक्षणिक सत्राचा पहिला प्रथम दिवस म्हणून शालेय पोषण आहारात गोड पदार्थाचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शौचालये स्वच्छ असावीत, धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना बसवू नये, पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत जोडणीची तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशाही सूचना दिलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या शासकीय तसेच खासगी शाळा,सीबीएसई शाळा अशा सगळ्यांना २३ जून रोजीच प्रवेशोत्सव राबविला जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे.
शाळा पाच दिवस सकाळी विदर्भात सोमवारीपासून शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे २३ ते २८ जून या पाच दिवस शाळा सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी ७ ते ११:४५ या कालावधीत घेण्याचे निर्देश दिले आहेत. ३० जूनपासून शाळा नियमित वेळेवर सुरू होणार आहेत.
लोकप्रतिनिधी राहणार स्वागताला उपस्थित शाळेच्या पहिल्या दिवशी १०० शाळांना खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, सीईओ, जि.प. अधिकारी व शिक्षण विभागाचे अधिकारी, डायटचे प्राचार्य, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांच्या भेटीत शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे यांनी दिली.
महापालिकेच्या ६३ शाळांमध्ये प्रवेशोत्सव महापालिका शाळा प्रवेशोत्सवात सुद्धा अधिकारी, लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशी स्वागतासाठी हजर राहतील, अशी माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी दिली. महापालिकेच्या ६३ शाळेत यंदा विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्याचे संकेत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





