अमरावती : घटना उन्हाळ्याच्या दिवसात घडतात. पण, गुरुवारला रात्री ९.३० वा. सुमारास पंचवटी चौकात एका धावत्या बसच्या इंजिनला आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. यावेळी बसमध्ये बसलेल्या काही प्रवाशांनी भितीपोटी आग विझविण्याची वाट न पाहता, जीव वाचविण्यासाठी थेट बसच्या काचा फोडत खिडकीतून बाहेर उड्या मारल्या.
तर आतमधील लोकांचा काही वेळ थरकाप उडाला होता. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारला रात्री ९.३० वा. सुमारास एमएच १४ बीटी ३८७० क्र मांकाची छत्रपती संभाजीनगर ते नागपूर ही बस पंचवटी चौकातून जात होती. उड्डाणपुलाखालून जात असताना या धावत्या बसच्या इंजिनमधून धुर निघताना चालकाला दिसले. पाहता पाहता चालकाच्या बाजुच्या भागाने पेट घेतल्याने गोंधळ उडाला. चालकाने सतर्कता दाखवत रोडच्या बाजुला बस थांबविली आणि आग विझविण्याचाचालक व वाहकाने प्रयत्न सुरु केला. मात्र चालकाच्या बाजुच्या भागातून निघणारा धूर आणि आग पाहताच बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. समोरून बाहेर पडावे की काय करावे ? असा प्रश्न पडला. काहींच्या तर जीवाचा थरकाप उडाला… त्यामुळे काही मागे पुढे न पाहता काही प्रवाशांनी थेट बसच्या काचा फोडून खिडकीतून बाहेर उड्या मारत आपला जीववाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसमध्ये १७ प्रवासी होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. चालक आणि वाहकाने मोठ्या हुशारीने आग विझविली. त्यानंतर दुसरी बस बोलावून प्रवाशांना नागपूरच्या प्रवाशांना रवाना करण्यात आले. सध्या बस पंचवटी येथील उड्डाणपुलाखाली उभी आहे. बसला आग लागल्यानंतर पंचवटी चौकात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





