चिखलदरा : कुपोषणापश्चात कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यात ढिगभर समस्या कायम आहेत. त्यासंदर्भात मंगळवारी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमदारांनी त्या मांडताच मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब आणि गांभीर्याने दखल घेत निकाली काढण्याचे आदेश दिले.
आमदार काळे यांनी मुख्यमंत्र्याकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे मांडल्या. चिखलदरा तालुक्यातील ३३ केव्ही जारिदा उपकेंद्राचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली.
या उपकेंद्राअभावी ५४ अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये सुरळीत वीजपुरवठा होत नाही. पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद असतात. शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा आणि शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी आवश्यक वीज उपलब्ध नसल्याने आदिवासींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मेळघाटातील प्रश्न सोडविण्याचे शासनाकडून आवश्यक कारवाईचे आश्वासन यावेळी सीएमनी दिले.
‘मानव विकास’ अंतर्गत ५५ बसगाड्या द्या मेळघाटमधील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत ५५ बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी आमदार काळे यांनी केली. आदिवासी विद्यार्थी दररोज शाळा गाठण्यासाठी मोठ्या अंतरावरून पायी प्रवास करतात.
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांकडून लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आमदार काळे यांना दिले. या आश्वासनामुळे विविध अडचणी दूर होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





